सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
ॲड.विजयसिंह मनोहर चौधरी यांची युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश निवडणुकीत सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.
इंदापूर तालुक्यातील अनेक विविध समस्या जाणून घेताना सामाजिक स्तरावर कार्यरत असणाऱ्या संस्था पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवित असताना ॲड. चौधरी यांनी प्रा. भास्कर गटकुळ आणि प्रा.जयश्री गटकुळ यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान प्रा. भास्कर गटकुळ आणि प्रा. जयश्री गटकुळ यांनी ॲड.विजयसिंह चौधरी यांचे अभिनंदन करून सन्मानित केले.
ॲड.चौधरी म्हणाले, युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर कार्यरत राहण्यासाठी कार्यकर्त्यांचे खूप मोठे योगदान आहे.आपण सर्व धर्म समभाव हा काँग्रेसचा विचार सर्वसामान्य माणसासाठी आचरणात आणणार आहे. इंदापूरकर आणि विद्यार्थी मित्रपरिवार यांची मला मोलाची साथ मिळाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात अशा विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागात मोफत अभ्यासिका देण्यासंदर्भात प्रयत्न चालू आहेत. इंदापुर मध्ये पत्रकार भवनची नित्तांत गरज असून प्रशस्त, सर्व सुविधांसह पत्रकार भवन इंदापूर शहरामध्ये उभे करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार आहे. इंदापूर तालुक्यात सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांनी उच्च व दर्जेदार शिक्षण घ्यावे म्हणून मेडिकल कॉलेज आणि मिलिटरी स्कूल उभे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत राहणार असल्याची ग्वाही ॲड.विजयसिंह चौधरी यांनी दिली
जिजाऊ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा प्रा.जयश्री गटकुळ यांनी युवकांना रोजगार निर्मिती, उद्योगधंद्यांना प्रोत्साहन, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केंद्र, गरीब विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह याबाबत महत्त्वाची भूमिका घेऊन युवकांना सहकार्य करण्याबाबतची अपेक्षा व्यक्त केली.
किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस तानाजी भोंग यांनी समाजातील तळागाळातील लोकांना आमच्या समवेत घेऊन राजकीय काम करताना युवकांसाठी विविध शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रम ग्रामीण भागात राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
यावेळी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अरुण राऊत, युवक काँग्रेस इंदापूर तालुका सरचिटणीस संतोष शेंडे
,युवक काँग्रेस पुणे शहर प्रमुख सचिन साबळे पाटील अन्य मान्यवर उपस्थित होते.