इंदापूर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती कारखान्यात अध्यक्षांना खुलासा देताना कार्यालयातील लोकांचा सल्ला घ्यावा लागतो हाच एक चेष्ठेचा विषय आहे. कारखान्याविषयी तळमळ आहे की नाही हे सभासद चांगलेच जाणतो, पण पृथ्वीराज जाचक कारखान्यात असल्यावर तुम्हाला का मळमळ होत होती ते एकदा समजू द्या! ही माती त्या बलिदान आणि पराकाष्टतेची आहे. इथे कित्येक बाजी घोरपडे आणि मंबाजी भोसले जन्मले म्हणून या मातीचा महिमा आणि पावित्र्य भंग झाले नाही, तेव्हा संचालकांची चौकशी लावल्याने कारखान्याची बदनामी झाली अशी कोल्हेकुई बंद करा अशी टीका छत्रपती कारखान्याची माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केली आहे.
छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी टीका केल्यानंतर पुन्हा एकदा पृथ्वीराज जाचक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपले मत मांडत कारखान्याच्या अध्यक्षांवर व संचालक मंडळावर टीका केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जाचक म्हणतात की, कुठलेही प्रकल्प नसताना छत्रपती कारखाना महाराष्ट्रातील पहिल्या तीन कारखान्यांच्या बरोबरीने भाव देत होता. कारखान्यास देशातील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचे पारितोषिक व इतर नऊ पारितोषिके मिळाली होती व ही सर्व पारितोषिके तत्कालीन कृषिमंत्री श्री शरद पवार यांच्या हस्ते मिळाली होती. मी मला कारखान्याला दिलेल्या संधीचे मी सभासदांच्या व कामगारांच्या प्रपंचासाठी सोने केले होते हे सर्वजण जाणतात.
कारखान्याची चौकशी ही श्री बागल या सभासदाच्या अर्जावरून झाली होती व त्यामध्ये चौकशी अधिकारी श्री घोडे यांनी नऊ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा निर्णय दिलेला आहे. मात्र राजकीय वजन वापरून सहकारमंत्र्याकडून या निर्णयाला यांनी स्थगिती घेतली व सदर प्रकरण कारखान्याच्या हितासाठी शेतकरी कृती समितीने उच्च न्यायालयात दाखल केले. सध्या ते प्रलंबित आहे व लवकर त्याची सुनावणी चालू होणार आहे याची नोंद घ्यावी.
कारखान्याच्या हितासाठी मी वेळोवेळी विरोध केला व न्यायालयात स्वखर्चाने गेलो. आपल्यासारखे चुकीचे काम करून कारखान्याच्या खर्चाने मी वकील फी व प्रवास खर्च दिलेला नाही व भविष्यात अजूनही कारखाना व सदस्यांच्या हितासाठी मिळाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठरवण्यास तयार आहे अशी टीका जाचक यांनी केली आहे.
कारखान्याचे प्रकल्प हे चुकीच्या पद्धतीने मांडले गेले, ते व्यवहार्य नव्हते, म्हणून मी विरोध केला व न्यायालयात गेलो. नाहीतर आज कारखाना जो थोडाफार चाललाय, ते पण दिसले नसते. मी कुठलीही गोष्ट लपून करत नाही हे माझ्या शत्रूंना व संबंधितांना चांगलेच माहिती आहे. कारखान्याचा प्रकल्प अहवाल, त्याचे फायदे तोटे हे अध्यक्ष आपण व आपल्या पाठीराख्यांच्या बौद्धिक क्षमतेपलीकडच्या गोष्टी आहेत याची नोंद घ्यावी.
जाचक म्हणाले, आपण दिवंगत कार्यकारी संचालकाच्या अंगावर कधी धावून गेलो नाही, मात्र श्री काटे व कै. अनारसे यांच्यामध्ये शाब्दिक कलह वाढल्यानंतर आपण काटे वकील यांना समजून सांगत होतो व त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष हेच काटे वकील यांच्या अंगावर धावून गेले होते ही वस्तुस्थिती आहे. ही बाब श्री काटे वकील यांना विचारून खात्री करून घ्यावी. अंगावर धावून त्याचा प्रश्नच नाही, मात्र कोणी अंगावर आल्यास त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही, राहणार नाही याची सर्वांना कल्पना आहे.
दरम्यान जाचक यांनी या प्रसिद्धी पत्रकात काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यामध्ये श्री छत्रपती कारखान्याची कच्ची साखर 3 हजार 100 रुपये प्रतिक्विंटलने व माळेगावची 3190 रुपये प्रतिक्विंटल ने विकली. तर श्री छत्रपती कारखान्याची मळी ही दर वाढत असल्यामुळे विकू नका असा सल्ला दिला असतानासुद्धा प्रतिटन 6000 रुपयांप्रमाणे दिली व आज मळीचा दर 8200 रुपये प्रतिटन पेक्षा जास्त आहे. त्याला जबाबदार कोण?
श्री छत्रपती कारखान्याच्या कच्च्या साखरेचे दुसरे टेंडर 3125 रुपये प्रति क्विंटलने दिले, तेच माळेगाव व सोमेश्वरने ज्यादा दराने दिलेले आहे. त्याची खात्री करा व मग बोला. मळी व साखरेची विक्री ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे व त्यामुळे कारखान्याचा तोटा झालेला आहे. अध्यक्ष हे सर्व संचालकांना विचारून निर्णय घेतल्याचे सांगतात, मात्र हे धादांत खोटे आहे. मळीची विक्री मर्जीतल्या व्यक्तीला देण्यासाठी जाणून-मधून मळीतील साखरेचे प्रमाण वाढवले जाते व खोटे रिपोर्ट संगनमताने दिले जातात.
कारखान्याच्या अध्यक्षांचा मुक्काम स्वतःच्या ऑफिसपेक्षा मॅन्युफॅक्चरिंग ऑफिसमध्ये का असतो? ही सर्व चर्चा कारखान्याचे अधिकारी व कामगारांमध्ये आहे. आपण अध्यक्ष असतानाच्या काळात मळी वाहून निरा नदीला गेली व पंढरपूर पर्यंत दुर्गंधी येत होती. अबकारी व उत्पादन शुल्क खात्याने कारखान्यावर केस केली होती, ती कशी मिटवली? संचालकांना अंधारात ठेवून चुकीची माहिती देऊन निर्णय घ्यायचा; खोटे निरोप सांगायचे व संचालकाचे सभागृहातील निर्णय सर्वांच्या संमतीने झाले असे सांगायचे व स्वतःच्या हितासाठी रेटून न्यायचे ही अध्यक्षांची कार्यशैली आहे अशी टीका त्यांनी केली.
काटे यांनी खरेदी कमी केल्याचा दावा केला होता. त्यावर जाचक म्हणाले, स्टोअर कमी करण्यावर मीच वेळोवेळी वार्षिक सभेमध्ये सूचना मांडली होती व त्याची प्रोसिडिंगमध्ये नोंद आहे. बेअरिंगच्या खरेदीतील चाललेला गैरप्रकार व इतर भानगडी योग्य व्यासपीठावर आम्ही मांडणार आहोत. युनियन बँकेचे बेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज 75 कोटी वर कसे गेले? याला आपणच जबाबदार आहात.
विस्तारवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी ही संचालक मंडळाची मुदत संपायला आठ दिवस बाकी असताना मिळाली किंवा मिळवली. त्यामुळे जे कोण नवीन संचालक असेल त्यांनी हा निर्णय घ्यावा, म्हणून ही स्थगिती घेतली होती व ती जेमतेम चार महिने होती. मात्र यांनाच बँकेचे कर्ज व इतर बाबींची पूर्तता करण्यास विलंब झाल्यामुळे त्याचे खापर ते माझ्यावर फोडत आहेत.
श्री छत्रपती ची झालेली विस्तारवाढीची एकूण किंमत व त्या सुमारास महाराष्ट्रामध्ये झालेल्या इतर प्रकल्पाच्या किमती लक्षात घेतल्या तर यातील गौडबंगाल सभासदांच्या लक्षात येईल. श्री छत्रपती शिक्षण संस्थेतील आलेल्या मान्यता व इतर प्रकार याबाबत व्यासपीठावर संबंधित शिक्षक येऊन सांगणार आहेत. याची कृपया अध्यक्षांनी नोंद घ्यावी व कायदेशीर बाबींची धमकी न देता केस दाखल करावी असे आव्हान जाचक यांनी प्रशांत काटे यांना दिले.