बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माळेगाव कारखान्यावर सन्मानाने आणण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार होता. तो आज प्रत्यक्षात साकारला. अकरा वर्षापूर्वी शरद पवार माळेगावच्या कारखान्यावर आले होते. विरोधी सत्ता उलथवून टाकल्यानंतर व माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन घडवून राष्ट्रवादीचे संचालक मंडळ निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज माळेगावच्या पदाधिकाऱ्यांच्या निमंत्रणावरून कारखान्यावर आले होते. ( NCP President Sharad Pawar visited the factory today at the invitation of Malegaon office bearers.)
मागील पाच वर्षात माळेगावमध्ये विरोधकांची सत्ता होती. त्यावेळी संपूर्ण पाच वर्षात शरद पवार तिकडे फिरकले नव्हते. माळेगाव कारखान्याची शिवनगर विद्या प्रसारक मंडळ ही शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या अभियांत्रिकी कॉलेजचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत. मध्यंतरीच्या काळात रंजन तावरे हे कारखान्याचे अध्यक्ष असताना शरद पवार यांनी या संस्थेच्या बैठकीला हजेरी लावली होती.
मात्र माळेगाव कारखान्यावर राष्ट्रवादीचीच एकहाती सत्ता आणून शरद पवार यांना खऱ्या अर्थाने भेट द्यायची आणि त्यांना सन्मानाने माळेगाव कारखान्यावर निमंत्रित करायची इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची होती.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ऐतिहासिक परिवर्तन झाले आणि माळेगावच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीचे संचालक मंडळ सत्तेवर आले. त्यापाठोपाठ सोमेश्वर मध्येही राष्ट्रवादीने वर्चस्व कायम राखत विरोधकांची धोबीपछाड केली. या हंगामात माळेगाव ने चालू गळीत हंगामात दहा लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला.
आज अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संचालकांच्या विनंतीवरुन माळेगाव कारखान्यास भेट दिली व कामकाजाची पाहणी केली तसेच संचालक मंडळाकडून सर्व माहिती जाणून घेतली साखर उद्योगातील विविध घडामोडींच्या संदर्भात त्यांनी संचालक मंडळाशी संवाद साधला. माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्यासह सर्व संचालक यावेळी उपस्थित होते.