सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
भिगवण येथील सामान्य कुटुंबातील पल्लवी सोनोने व कल्याणी सोनोने या सख्ख्या बहिणींनी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कला क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावत इंदापूर तालुक्याचे नाव देशात झळकवण्याचे काम केले आहे, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पल्लवी सोनोने यांना महिला दिनानिमित्त भारत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या वतीने वूमन सिनेमा अँड आर्टस् इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने तावशी ( ता.इंदापूर ) येथील जाहीर कार्यक्रमात पल्लवी सोनोने यांना महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
पल्लवी सोनोने दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेली आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील सोनोने भगिनींनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कला क्षेत्रात ठसा उमटवला आहे. अभिनयाच्या जोरावर त्यांनी सर्वसामान्यांची मने जिंकली आहेत. त्यामुळे त्यांना पुरस्कार मिळाला. या पुरस्कारमुळे त्यांनी केलेल्या कलाकारीची पावती त्यांना मिळाली आहे. इथून पुढे त्यांची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द बहरत जावून इंदापूरचे नाव असेच देशात चमकत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन भरणे यांनी सोनोने यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासमवेत ‘ लागीर झाल जी ‘ फेम कल्याणी सोनोने -चौधरी यांचाही सन्मान केला. यावेळी भिगवणचे सचिन बोगावात, आण्णा धवडे,अजिंक्य माडगे, प्रमोद बंडगर, मनोज राक्षे आदी मान्यवर उपस्थित होते.