मंत्रिपदाच्या १९ वर्षाच्या काळात हर्षवर्धन पाटलांनी तालुक्याचा विकास न करता फक्त रुबाबच केला..! आता गावात दोन लाख द्यायचे.. त्यासाठी दहा- वीस वेळा नारळ फोडून, उद्घाटन केले जात आहेत — राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हर्षवर्धन पाटलांवर हल्लाबोल.. जनतेने दोन वेळा घरी बसविले आहे.. आता शांत रहा.. विश्रांती करा.. आम्हाला आमचं काम करू द्या दिला सल्ला..
सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सत्तेच्या मिळालेल्या खुर्चीचा उपयोग सर्वसामान्य, गोरगरीब, मागासवर्गीय लोकांसाठी करायचा असतो, त्यासाठी मी रात्रंदिवस काम करत आहे. सत्तेच्या १९ वर्षाच्या मंत्री काळात तालुक्याच्या विकासाकडे कधीच लक्ष दिले नाही, सत्तेच्या काळात जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष न देता त्यांनी फक्त रुबाबच केला, असा घणाघाती आरोप राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांवर केला आहे. त्यांच्याकडे सत्ता नाही.या काळात दोन- दोन लाख रुपये द्यायचे व त्यांचे दहा वीस वेळा उद्घाटने करायची फोटो काढायचे व जातीपातीचे विषारी प्रचार करून स्वतःची पोळी भाजायची असले काम सध्या चालू असल्याचे सांगत जनतेने त्यांना दोन्ही वेळेस घरी बसवले आहे आता तरी त्यांनी शांत राहत विश्रांती घेण्याचा सल्ला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांना देत त्यांच्या चाललेल्या कार्यपद्धतीवर त्यांनी चांगलाच समाचार घेतला .
गोखळी येथे आठ कोटी ७५ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटनाचा कार्यक्रम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडला.अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर हे होते.
दरम्यान या देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार तीन तारखेला इंदापुर तालुक्यात लाखेवाडी ते कार्यक्रमानिमित्त उपस्थित होत असून यावेळी होणाऱ्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक व माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर यांचा जाहीर प्रवेश होत असल्याचे संकेत त्यांनी दिले. ढोले यांच्या प्रवेशाने हर्षवर्धन पाटील यांना नक्कीच धक्का मानला जाईल. यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या भागात मोठे खिंडार पडणार असल्याचे दिसत असून या कार्यक्रमात कोण कोण प्रवेश करणार, कोण गळाला लागले आहे हे तीन तारखेला स्पष्ट होणार आहे.
यावेळी झालेल्या सभेत राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्याच्या विकासाच्या सुरु असलेल्या कामाची माहिती स्पष्ट केली. इंदापूर तालुक्याच्या जनतेसाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगत असताना निष्क्रीय असल्याच्या होत आरोपावर त्यांनी विरोधकांना चांगलेच खडे बोल सुनावले. मी काम करताना जातीपातीचा, जवळचा लांबचा, गटातटाचा विचार करत नाही, जवळचा विचार करत नाही. मात्र विरोधकांनी आता लोकांना खोटंनाटं बोलायचं, लोकांना बनवायचं, त्यांच्या पाठीवर थाप टाकायची, आपल्याला बसायचंय, चहा प्यायला येतो, जेवायला येतो असा सपाटा चालू केला आहे. नुसता अरे खरा शेतकरी मी आहे. शेतकऱ्यांचे दुःख , खान मला माहिती आहे, मात्र विरोधकांची शेती पिकली नाही तरी त्यांना काही फरक पडणार नाही. त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे. मध्यंतरी झालेल्या इंदापूर येथील सभेत माझ्यावर एकेरी भाषेत बोलले. माझी घरची परिस्थिती ही तालुक्याला माहिती आहे. तुमची १९९५ अगोदरची काय परिस्थिती होती, माझी काय होती हे सर्वांना माहिती आहे. हे काय आभाळातून पडलंय का? असे सांगत आम्ही बोलायला लागलो तर तुमच्या तोंडाची वाचा सुद्धा बंद होईल, आमच्याकडे बराच मसाला शिल्लक आहे, असा इशारा त्यांनी पाटील यांना दिला. तालुक्यातला बारका पोरगा पण सांगल की मामा काय आहेत व पुढची माणसं काय आहेत, असे सांगत आपल्याला वैयक्तिक कुणावर टीका करायची नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मी रात्रंदिवस जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो.आणि विरोधक माझ्यावर एवढ्या आरोप करतात तेव्हा मला किती दुःख होत असेल, झोपताना किती त्रास होत असेल हे माझ्या जिवालाच माहिती आहे असे सांगत भरणे म्हणाले कुणाला वाटतं, जो अहोरात्र काम करतो त्या माणसावर आरोप केल्यावर वाईट वाटतं, विरोधक मला निष्क्रिय म्हणतात अरे त्यांच्या तोंडाला, जिभेला काही हाड आहे का नाही? असे सांगत आम्ही २०१२ पासून सत्तेवर आल्यापासून तालुक्यातील रस्ते झाले, अनेक कामे झाली. तुमच्या काळात कुठे होते रस्ते? योजना का झाल्या नाहीत. आता तालुक्याचं चित्र बदलत चाललंय आता तालुक्यात कुठल्याही कोपऱ्यात जायचं म्हटलं तर एक किलोमीटरचा रस्ता सुद्धा शिल्लक ठेवला नाही. थोड्याच दिवसात इंदापुरात उद्घाटन आपण घेतोय. मात्र या लोकांना इतकी घाई झाली आहे, उद्घाटन दिसलं की लगेच येऊन फक्त नारळ फोडायचे आम्ही केलं असं सांगत फोटो काढायचे एवढेच काम त्यांचे सध्या चालू आहे असल्याचा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला आहे.
गोखळीच्या भागाला पाण्याच्या समस्येला सतत तोंड द्यावे लागत आहे, प्रदीप गारटकर यांनी सांगितल्या प्रमाणे तरंगवाडी तलावाची दुरुस्ती करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. जवळ असलेल्या फॉरेस्ट बाबत पाणीप्रश्नावर होत असलेल्या समस्याबाबत निपटारा करण्यासाठी पुन्हा एकदा संयुक्त बैठक बैठक घेण्यात येईल, त्याचं काय मार्ग निघतो का हे पाहून निश्चित सहकार्य केले जाईल. तसेच या भागातील अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्य मंत्री भरणे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी सभापती प्रशांत पाटील, माजी आरोग्य सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने,युवा नेते, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस डॉ. शशिकांत तरंगे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांची भाषणे झाली. प्रताप पाटील, शुभम निंबाळकर, सतीश पांढरे, सचिन खामगळ, हामा पाटील, कान्होपात्रा जाधव, बापूसाहेब पोळ उपस्थित होते.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्वागत सरपंच अलका पोळ व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केले. प्रास्ताविक उपसरपंच सचिन तरंगे यांनी केले. सूत्रसंचालन हरणावळ गुरुजी यांनी केले.