बारामती : महान्यूज लाईव्ह
राजकीय स्तरावर एकत्र काम करायचे असेल तर समविचारी पक्षांनी सगळ्यांनी एकत्र आलेले आनंदाची गोष्ट आहे. विकास कामासाठी सगळे एकत्र येणार असतील आणि त्यातून राज्यासाठी काही चांगले होणार असेल तर ही चांगली गोष्ट असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. एम आय एम या राजकीय पक्षाने महाविकासआघाडी मध्ये येण्यासंदर्भात सूतोवाच केले आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांना विचारले असता, त्या बोलत होत्या. मात्र यासंदर्भात शिवसेनेविषयी विचारले असता त्यांनी सावध पवित्रा घेतला. अर्थात एम आय एम चे नेते नेमके काय म्हणाले मला माहित नाही. सगळा विषय समजून घेतल्यानंतर मला व्यवस्थित बोलता येईल असेही सुळे म्हणाल्या.
किरीट सोमय्या सातत्याने संदर्भातील माहिती बाहेर देत आहेत. त्यांच्या संदर्भातील प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, जेव्हा एखाद्या परीक्षेमध्ये अथवा एखाद्या भरतीमध्ये त्याचा परीक्षेचा पेपर फुटला तेव्हा त्याची चौकशी होते. इथे तर सतत गोपनीय माहिती बाहेर पडत आहे. तेव्हा अर्थातच त्याची चौकशी झाली पाहिजे. ईडी, सीबीआय या सगळ्या महत्त्वाच्या संस्था आहेत. त्यांची माहिती अशी बाहेर येत असेल तर ही बाब देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी चिंतेची बाब आहे. मी ही बाब अमित शहा यांच्या लक्षात आणून देणार आहे.
सातत्याने भाजप सरकार काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या कारकीर्दीवर बोलत असते, या विषयावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, आता टीका करायला यांच्याकडे काहीच नाही. देशांमध्ये आठ वर्ष भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. ज्यांना काम करायचे असते, त्यांच्यासाठी आठ वर्ष हा मोठा कालावधी असतो. अजूनही सातत्याने पंडित नेहरूंचा उल्लेख केला जात असेल तर हे सिद्ध होते त्यांच्याकडे काहीही मुद्दे नाहीत.
राजू शेट्टी हे महाविकास आघाडीच्या विरोधात सातत्याने बोलत आहेत. ते महाविकास आघाडी सोडण्याच्या मनस्थितीत आहेत, यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मी वास्तवतेकडे बघते चित्राकडे बघत नाही.