किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
बॅंकेच्या शिपायानेच बॅंकेच्या मयत खातेदाराच्या नावे एटीएम कार्ड तयार करून खात्यातील रकमेचा अपहार केला असल्याचे इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे उघड झाले आहे. भवानीनगर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या मयत खातेदाराच्या नावे एटीएममधून साडेचार लाखाची रक्कम काढली गेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात पोलीसांनी यश मिळवले आहे.
बाळकृष्ण हनुमंत वणवे यांचे बॅंक ऑफ महाराष्ट्र व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक येथे खाते होते. बाळकृ्ष्ण वणवे यांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. परंतू त्यांच्या बॅंक खात्यावरून ७ ते १५ जानेवारी या काळात एटीएममधून ४ लाख ५० हजार ३७२ रुपये काढले गेले होते. याबाबत बाळकृष्ण यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी तक्रार दिली होती.
पोलीसांनी तपास सुरु केल्यानंतर सीसीटीव्ही फूटेज मिळवून त्याआधारे तपासास सुरुवात केली. यावेळेस या सीसीटिव्ही फूटेजमध्ये आकाश अशोक झेंडे ( रा. लासुर्णे, ता. इंदापूर ) हा आढळून आला. आकाश बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कळस शाखेत शिपाई म्हणून काम करतो. पोलीसांनी आकाशला अटक केली आहे.
वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बी.एन. लातूरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी निकम, पोलीस नाईक विनोद पवार, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील यांनी आरोपीस ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस हवालदार गुलाबराव पाटील करीत आहेत.
आकाश याने एटीएम मधून 50 हजार रुपयांप्रमाणे पैसे काढल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. यामध्ये त्याला कोणी साथीदार होता का? याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र कुंपणानेच शेत खाल्ल्याने आता बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल बँकेच्या खातेदारांमध्ये आहे. मुळात भवानीनगर च्या महाराष्ट्र बँकेत हिंदी भाषिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांची आणि खातेदारांची लिंकच जुळत नाही. हे अधिकारी-कर्मचारी व्यवस्थित उत्तरे देत नाहीत.
मागणी नसताना एटीएम कसे काढले गेले?
जर खातेदाराने एटीएम कार्डची मागणी केली, त्यासाठी अर्जांची पूर्तता केली तरच एटीएम कार्ड दिले जाते. त्यातही त्याची प्रक्रिया स्थानिक शाखेपासून ते वरिष्ठ स्तरापर्यंत होत असते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असते. त्यामुळे या ऑनलाइन प्रक्रियेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची संमती असावी लागते. याचा विचार करता मुळात वणवे यांच्या खात्यातून एटीएम कार्डची मागणी नेमकी कोणी केली? या कार्ड साठी कोणी अर्ज केला होता? तसेच या अर्जाला मंजुरी कोणी दिली? इथपासून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे हवालदार गुलाबराव पाटील म्हणाले, या प्रकरणात दोन दिवस सुट्ट्या होत्या. मात्र आता आम्ही महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी करणार आहोत.