भवानीनगर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील तावशी येथे आज संध्याकाळी सहा वाजता सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची जाहीर सभा होणार आहे. तावशी गावातील विविध विकास कामांच्या निमित्ताने ही सभा होत असून, तावशी व परिसरातील १२ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ होणार आहे. ( A public meeting of Minister of State for Public Works Dattatraya Bharane will be held at Tawshi in Indapur taluka at 6 pm today. The meeting was held on the occasion of various development works in Tawshi village)

गेल्या काही दिवसांपासून दत्तात्रय भरणे यांनी तालुक्याच्या विविध भागात विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटनांचा सपाटा चालवला आहे. विविध गावांमध्ये १० ते १२ कोटींची विकास कामे आणि त्या निमित्ताने त्या परिसरात जाहीर सभा घेत, दत्तात्रय भरणे हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी करत आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून थांबलेली जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक तसेच छत्रपती कारखान्यासह विविध विकास संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षातील कामाचा लेखाजोखा आणि आपल्या कामाची दिशा भरणे हे लोकांसमोर मांडत आहेत.
आज संध्याकाळी तावशी ते भवानीनगर या दोन कोटीच्या रस्त्याचे तसेच तावशी उदमाईवाडी थोरातवाडी या तब्बल दहा कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे तसेच तावशी- सपकळवाडी – सणसर या 45 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे आणि तावशी येथील जाधव वस्ती थोरात वस्ती या पाच लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे उद्घाटन व भूमिपूजन भरणे करणार आहेत.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, प्रताप पाटील, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक रणजीत निंबाळकर, रसिक सरक, डॉ. कमलाकर व्होरकाटे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शुभम निंबाळकर हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.