सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात काँग्रेस पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व पुणे जिल्हा काँग्रेसचे सह प्रभारी दादू शेठ खान यांनी आज इंदापुरात तालुका काँग्रेस कमिटीची सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. इंदापूर तालुक्यात इतर कोणताही राजकीय विरोधी पक्ष प्रबळ असला तरी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ‘ किंगमेकर होणार ‘ असून निवडणुकीत होणा-या मतदानातून ते सिद्ध होईल, असा विश्वास दादूशेठ खान यांनी बैठकीत व्यक्त केला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे डिजिटल सभासद नोंदणी अभियान सुरू आहे. त्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील सभासद नोंदणीचा अहवाल घेण्यासाठी आज ते इंदापूर येथे आले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा आढावा घेतला. प्रारंभी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी खान यांचे स्वागत केले.
दादू शेठ खान म्हणाले, इंदापूर तालुक्यामधील काँग्रेस पक्षाला मानणारा एक मोठा वर्ग आहे. सध्या सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानास चांगला प्रतिसाद मिळत असून गावोगावी बुथ पातळीवर व प्रत्येक घरापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचून जास्तीत जास्त सभासद नोंदवण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.
येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते इंदापूर तालुक्यात प्रचारासाठी येणार आहेत,अशी माहिती देवून खान म्हणाले की इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे जरी ताकत जास्त असली तरी येणाऱ्या काळात काँग्रेसच किंगमेकर ठरणार आहे, आणि ते निवडणुकीमधून व मतामधून सिद्ध होईल, असा विश्वास खान यांनी व्यक्त केला. पुढील काही दिवसात काँग्रेसमध्ये सुद्धा काही प्रवेश होतील, नवीन लोकांसाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी काँग्रेस पक्षाचा सध्या सुरू असलेल्या कामाचा संपूर्ण तालुक्याचा आढावा दिला. यावेळी कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जकिरभाई काझी, शहराध्यक्ष चमनभाई बागवान, किसान काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. संतोष होगले, सरचिटणीस महादेव लोंढे, राहुल वीर , संतोष आरडे, खजिनदार भगवान पासगे , जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष आकाश पवार, श्रीनिवास पाटील , निखिल निंबाळकर , निसार शेख, बाळासाहेब गायकवाड, चंदनशिवे आदी उपस्थित होते.