दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील चौघांनी भिगवण येथील चाळीस वर्षीय महिलेला रस्त्यावर अडवून जातीवाचक शिवीगाळ,दमदाटी व विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी स्वामी चिंचोली येथे सोसायटी निवडणुकीत उमेदवाराचा पराभव झाल्याने काठ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. दोन दिवसांत पुन्हा एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरात हा चांगलाच चर्चेच विषय ठरला आहे.
संतोष शिंदे, विठ्ठल गुणवरे, विठ्ठल शिंदे,नवनाथ वेताळ ( सर्व रा. स्वामी चिचोंली ता. दौंड ) असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी ( दि.१५ ) रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत रोडवर ऊसाच्या शेताजवळ एक पांढरा रंगाची क्रेटा गाडीने फिर्यादी महिलेल्या मोटर सायकलीला कट मारला. अचानक गाडीसमोर येवून थांबून त्या गाडीचा ड्रायव्हर संतोष शिंदे व विठ्ठल गुणवरे दोघेजण खाली उतरले. त्यांनी मोटारसायकलवरील संबंधित महिला व तिच्या बरोबर असलेल्या तरुणास अरेरावीची भाषा करीत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच गाडीतील विठ्ठल शिंदे व नवनाथ वेताळ यांनी देखील दोघांना गाडीमधून शिवीगाळ केली. लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला, तसेच जिवे मारण्याची धमकी देवून कोणाला काही सांगितल्यास माझे इतके वाईट कोण नाही, अशी दमबाजी करून निघुन गेले, अशी फिर्याद या महिलेने दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यानूसार अनुसुचित जातीजमाती कायद्याअंतर्गत व विनयभंग केल्याप्रकरणी या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे या घटनेचा तपास करीत आहेत.