दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यामध्ये मागील काही दिवसांपासून मौल्यवान किंमतीचे रसायन व साहित्याची चोरी झाल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. इटरनिस फाईन केमिकल्स कंपनीमध्ये मागील तीन वर्षात ५ कोटी ४७ लाख २० हजार ३८५ रुपये किंमतीच्या रसायनाच्या अमेरिकन कंपनीच्या बॅाक्सची अज्ञात चोरांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती दौंड पोलीसांनी दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरकुंभ येथील इटरनिस फाईन केमिकल्स लिमिटेड या कंपनीमधील कॅटॅलिस्ट रूममध्ये गेल्या तीन वर्षापासून चोरी होत आहे.
२४ डिसेंबर २०२० रोजी १ कोटी ५० लाख ८६ हजार ९४३ रूपये किंमतीचे १० किलो रोडिअम ऑन अॅल्युमिना नावाच्या केमिकलचे जॉनसन मॅथे नावाचे अमेरिकन कंपनीचे बॉक्स चोरीला गेले. २ सप्टेंबर २०२१ रोजी ३ कोटी ९६ लाख ३३ हजार ४४२ रूपये किंमतीचे १० किलो रोडिअम ऑन अॅल्युमिना नावाचे केमिकलच्या जॉनसन मॅथे नावाचे अमेरिकन कंपनीचे बॉक्सची चोरी झाली.
२४ डिसेंबर २०२० ते ६ जानेवारी २०२२ या तीन वर्षांच्या कालवधी दरम्यान कंपनीचे कॅटॅलिस्ट रूममधुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कंपनीचे २० किलो रोडिअम ऑन अॅल्युमिना केमिकल चोरून नेलेल्याची घटना घडली आहे.
याबाबत कंपनीचे अधिकारी विष्णु बाजीराव डुबे यांनी बुधवारी ( दि.१६ ) दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने अज्ञात चोरांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील लोढे हे पुढील तपास करीत आहेत.