मुंबई : महान्यूज लाईव्ह
संधी मिळाले तर भारतीय तंत्रज्ञ काय करू शकतात, याची प्रचिती आज डीआरडीओ ( डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ) ने साऱ्या देशाला दाखवून दिली. केवळ ४५ दिवसात डिआरडिओने बंगळूरूमध्ये उभारलेल्या सात मजली इमारतीचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले .
ही इमारत डिआरडिओच्या विविध संरक्षण साहित्य निर्मितीसाठी वापरली जाणार आहे. ही इमारत बांधण्यासाठी डिआरडिओने विकसित केलेल्या हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या इमारतीच्या कामाचे भुमिपूजन २२ नोव्हेंबर २०२१ रोजी झाले होते, तर प्रत्यक्ष बांधकामाला १ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरुवात झाली होती. हा इमारत बांधणी क्षेत्रातील देशातील विक्रम असून कोणत्याही सरकारी एजन्सीला आजपर्यंत हे करता आलेले नाही.
हा एक चमत्कारच आहे, अशा शब्दात संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या इमारत उभारणीच्या कामात सहभागी असणाऱ्या सर्वांचे अभीनंदन केले.
जर संधी मिळाली तर भारतीय तंत्रज्ञही किती वेगवान काम करू शकतात याचे ही इमारत म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.