शीतल अहिवळे
फलटण : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय मराठी साहित्य संमेलन सोमवार दिनांक २१ व २२ मार्च २०२२ रोजी फलटण, जि.सातारा येथील महाराजा मंगल कार्यालय येथे आयोजित केले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक व प्रसिद्ध ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांची निवड झाली आहे. तसेच नियोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व ज्येष्ठ कथाकार भारत सासणे व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव प्रसिद्ध कवियत्री व चित्रकार मीनाक्षी पाटील संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले व कार्याध्यक्ष डॉ. सचिन सूर्यवंशी ( बेडके ) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्घाटन समारंभ दिनांक २१ मार्च रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० ते या वेळेत होणार असून उद्घाटनासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व मराठी भाषा राज्यमंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम यांना निमंत्रित केले आहे. या संमेलनाचे संयोजक म.सा.प पुणे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ व म.सा.प फलटण शाखा अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे आहेत. दिनांक २१ मार्चच्या उद्दघाटन समारंभात महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा ) व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांना यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार तसेच छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह अनेक मालिकांचे प्रसिद्ध पटकथा, कथालेखक प्रताप गंगावणे यांना यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल प्रा. मिलिंद जोशी, जयंत येलुरकर व प्रकाश होळकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल रवींद्र बेडकिहाळ, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल विनोद कुलकर्णी,सातारा व प्रमोद आडकर,पुणे तसेच आपल्या मुलीच्या लग्नात पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ रुपये एक लाखांची पुस्तके रुखवतात भेट देणारे जयवंत तांबे गुरुजी व सायकलवरून पंचवीस हजार किलोमीटर प्रवास करून गावोगावी शाळा वाचनालय यांना आतापर्यंत दहा हजार पुस्तके देणगी म्हणून देणारे जीवन इंगळे,बुध या दोघांचा वाचन संस्कृतीला बळ दिल्याबद्दल तसेच महाराष्ट्र राज्य मल्टीस्टेट को-ऑप फेडरेशनवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल दिलीपसिंह भोसले व श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन सूर्यवंशी बेडके यांना अंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल या सर्वांचे उद्घाटन समारंभात विशेष सत्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती या संमेलानाचे संयोजक रवींद्र बेडकिहाळ व म.सा.प शाखा अध्यक्ष शांताराम आवटे यांनी दिली.
संमेलनातील अन्य कार्यक्रम या प्रमाणे दिनांक २१ मार्च दुपारी २.३० वाजता परिसंवाद विषय-आजची प्रसार माध्यमे व साहित्यिक सद्यस्थितीत समाज प्रबोधनात कमी पडत आहेत का ? अध्यक्ष वसंत भोसले,संपादक-दै.लोकमत कोल्हापूर सहभागी वक्ते ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ,न्यूज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय वेबपोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ व सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, भारती विद्यापीठाचे प्रा. डॉ. वैभव ढमाळ सहभागी होणार आहेत.
याच दिवशी सभागृहात सायं. ४.३० ते ६ वा.पर्यंत निमंत्रितांचे कवीसंमेलन होणार आहे. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवियत्री, चित्रकार व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या प्रमुख सचिव मिनाक्षी पाटील असतील, यामध्ये प्रसिद्ध कवी उद्धव कानडे, प्रकाश होळकर, बंडा जोशी, दीपक करंदीकर, राजन लाखे, श्रीनिवास वारुंजीकर, डॉ.राजेंद्र माने, डॉ.अशोक शिंदे,अविनाश चव्हाण, सुभाष सरदेशमुख, रंजना सानप, संजय जगताप,आर.डी.पाटील,सौ.आराधना गुरव,गोविंद काळे, पोपटराव कासुर्डे,शंकर कवळे,सौ.रंजना सानप,सौ.आराधना गुरव,शंकर कवळे यांचा सहभाग असून याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी ताराचंद्र आवळे करणार आहेत.
सायं.६.३० वा. कार्यालयाच्या वरच्या सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकारी विश्वस्त मंडळ,कार्यकारी मंडळ सदस्यांची सभा होणार आहे.
त्यानंतर रात्री ९ वाजता कार्यालयातील हिरवळीवर अनौपचारिक गाण्याची मैफिल किस्से व गावरान भोजन कार्यक्रम सुधीर गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच यावेळी येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ व रसिक डॉक्टर प्रसाद जोशी सपत्नी काही भावपूर्ण गीते सादर करणार आहेत.
दुसऱ्या दिवशी दिनांक २२ मार्च मंगळवारी सकाळी ११ वा. सातारी कवीसंमेलन प्रसिद्ध कवी ताराचंद्र आवळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील २५ कवींचा सहभाग असणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध विनोदी कथाकार प्रा. रवींद्र कोकरे, फलटण विं. दा. पिंगळे ( पुणे ), ज.तु.गार्डे ( कापशी ) यांचे कथाकथन कार्यक्रम दुपारी १ वाजता आयोजित केला आहे.
त्यानंतर संमेलनाचा समारोप संमेलनाध्यक्ष सुधीर गाडगीळ यांच्या सह मासाप पुणे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारती विद्यापीठाचे सह कार्यवाह डॉ. महादेव शिवलिंग सगरे यांच्या हस्ते होणार आहे. साहित्यप्रेमी रसिक, मसाप पुण्याच्या विविध शाखांचे पदाधिकारी,सदस्य,यांच्यासह फलटणमधील नागरिकांनी या संमेलनात आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेने केले आहे.