मुंबई : महान्यूज लाईव्ह
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल शपथ घेताच आजपासून कामाला सुरुवात केली आहे. आजच्या पहिल्याच घोषणेत त्यांनी पंजाबमधून भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी कंबर कसली आहे.
भगवंत मान यांनी एका व्हिडिओद्वारे राज्यात लाच मागणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरु करत असल्याची घोषणा केली. या हेल्पलाईन नंबरवर लाच मागणाऱ्या व्यक्तीचा ऑडिओ किंवा व्हिडिओ पाठवावा असे भगवंत मान यांनी यांच्या व्हिडिओ संदेशात म्हणले आहे.
‘ जर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने तुमच्याकडे लाच मागितली तर त्याला काही बोलू नका, फक्त त्याचा ऑडिओ किंवा व्हिडिओ तयार करून या हेल्पलाईन नंबरवर पाठवावा. मी स्वत: या हेल्पलाईन नंबरवर येणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवणार आहे. यातील दोषी व्यक्तींवर राज्य सरकार नक्कीच कारवाई करेल.’ असे भगवंत मान यांनी म्हणले आहे.
२३ मार्च रोजी शहिद दिनादिवशी हा हेल्पलाईन नंबर जाहिर केला जाईल. २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना फासावर चढविण्यात आले होते. तोच दिवस भष्टाचारविरोधी हेल्पलाईन सुरु करण्यासाठी निवडण्यात आला आहे.
आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनातून उभा राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचार नष्ट करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असते. त्यामुळे पंजाबमध्येही सत्ता मिळताच आप सरकारने पहिला निर्णय भ्रष्टाचारावर अंकुश आणण्याचा घेतला आहे.