दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई, दि. १६ : भरदिवसा वाई पोलिसांची नजर चुकवत वाई शहरातून बेकायदेशीर देशी दारुची पाचगणीच्या दिशेने जाण्यासाठी चोरटी वाहतूक करणारी मारुती कार व देशी दारुचे ८ बॉक्स असा एकूण ८३०४० रुपयांचा माल जप्त केला आहे.
वाई पोलीस ठाण्यातील डिबी पथकाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवर झडप घालून ही धाडसी कारवाई केल्याने वाई शहरात एकच खळबळ उडाली आहे . या प्रकरणी विकास भास्कर पिसाळ (वय २९ रा. बावधन ता. वाई) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना त्यांचा खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वाई शहरातील चावडी चौक ते वाई नगरपरिषद रस्त्यावरुन निळ्या रंगाच्या मारुती कार (एमएच/०४/ एवाय/४९१०) मधून एक चालक विना परवाना देशी दारुची वाहतूक करीत आहे. ही माहिती मिळताच त्यांनी तातडिने डिबी पथकाचे सहाय्यक फौजदार विजय शिर्के यांना सूचना केली. त्यांनी तातडीने महिला पोलिस नाईक सोनाली माने, कॉन्स्टेबल किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर यांना सोबत घेऊन सापळा लावला.
त्यानुसार वरील सर्व पोलिस कर्मचारी सदर वाहनाचा वाई शहरात शोध घेत असताना संबंधित कार विष्णू मंदिराच्या समोरच दिसल्याने ही कार थांबवली व चालकाला बाहेर बोलावले. त्यास नांव पत्ता विचारुन त्याच्या ताब्यात मिळालेल्या मारुती कारची (एमएच/०४/एवाय/४९१०) झडती घेतली असता त्याचे पाठी मागील सीटवर ४ देशी दारुचे बॉक्स व पाठीमागे ४ देशी दारुचे बॉक्स मिळून आले.
या आरोपी कडून ६० हजार रुपये किंमतीची मारुती कार व २३ हजार रुपये किंमतीच्या देशी दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. आरोपी विरुध्द वाई पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला असून गुन्हयाचा तपास महिला पोलिस नाईक सोनाली माने या करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक अजित बो-हाडे, वाईच्या डिवायएसपी शितल जानवे-खराडे व पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय शिर्के, महीला पोलीस नाईक सोनाली माने, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर यांनी केली.