अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही महिन्यांपासून लाचखोरीची प्रकरणे अनेक घडत असताना देखील सरकारमधील नोकरांना त्याची काहीच लाज वाटेनाशी झाली आहे. पाचशे रुपये मागणाऱ्या महिलेपासून ते पाच लाख मागणाऱ्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण अडकले, परंतु तरी देखील लाचखोरी काही संपत नाही. काल आंबेगाव तालुक्यातील खेड तालुक्यातील महाळुंगे आंबेठाण येथील तलाठी वर्षा मधुकर धामणे या महिलेला वीस हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये खरेदी केलेल्या महाळुंगे येथील जमिनीच्या सातबारा नोंदीसाठी तक्रारदार शेतकरी हे सातत्याने वर्षा धामणे हिच्या संपर्कात होते. मात्र वर्षा धामणे ही तलाठी त्या खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा ची नोंद करत नव्हती. तिने सुरुवातीला अकबर नावाच्या खाजगी इसमास या संदर्भातील पुढील तजवीज करण्याची सूचना केली.
त्यावरून अकबर याने एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तलाठी वर्षा धामणे हिने 30000 रुपयांची लाचीची मागणी करून तडजोडी अंतिम वीस हजार रुपयांची लाच स्वीकारली. यासंदर्भात तक्रारदार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर ५ मार्च, ८ मार्च, १० मार्च व ११ मार्च या चार दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली.
तेव्हा संबंधित तलाठी महिलेने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आंबेठाण गावच्या तलाठी कार्यालयात सापळा रचला. यावेळी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना वर्षा धामणे हिला व अकबर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.