किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
परदेशात असलेल्या आपल्या मुलाला खाद्यपदार्थांचे पार्सल कुरियरने पाठविलेल्या ग्राहकाला कुरियर विलंबाने मिळाल्यामुळे जिल्हा ग्राहक आयोगाने पुणेस्थित कुरिअर कंपनीला 94 हजार रुपये नुकसानभरपाईचा दंड ठोठावला. (Pune’s courier company shocked by consumer commission! Order to pay compensation of Rs 94,000!)
याविषयीची सविस्तर हकीकत अशी की अलिबाग जिल्हा रायगड येथील दिलीप ओक यांचा मुलगा मयूर हे परदेशात फ्रान्स मधील टुलुस शहरात वास्तव्यास आहेत. फ्रान्समध्ये गेल्यावर्षी टाळेबंदीचे कडक निर्बंध असल्यामुळे तेथे खाद्यपदार्थ मिळण्यासही अडचण निर्माण झाली होती.
त्यामुळे दिलीप ओक यांनी मुलगा मयूर यांच्यासाठी युडीएक्स वर्ल्डवाईड इंटरनॅशनल कुरीयर अॅड लॉजिस्टिक कंपनी पुणे या कुरियर कंपनीच्या मार्फत खाद्यपदार्थाचे पार्सल दिनांक 5 फेब्रुवारी 21 रोजी पाठविले होते.
26 हजार 984 रुपयांचे हे खाद्यपदार्थ फ्रान्सच्या टूलूस शहरात पोचविण्यासाठी संबंधित कुरिअर कंपनीने 37 हजार 280 रुपये पार्सलचे चार्जेस आकारले. हे पार्सल मयुर ओक यांना साधारण चार-पाच दिवसात फ्रान्स येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र 32 दिवस उशिराने हे पार्सल मयूर ओक यांना मिळाले.
त्यामुळे हे खाद्यपदार्थ खराब झाले होते. याविषयी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने संबंधित कुरियर कंपनीस संपर्क साधून समन्वयाने प्रश्न सोडविण्यासाठी पत्र पाठविले होते, मात्र त्यास प्रतिसाद न दिल्याने दिलीप ओक यांनी कुरिअर कंपनीच्या सेवेतील हलगर्जीपणामुळे अलिबाग येथील ग्राहक आयोगात 7 सप्टेंबर 2021 रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मार्गदर्शनाने तक्रार दाखल केली.
दिलीप ओक यांनी तक्रारीच्या पुष्ट्यर्थ कुरियर ची पावती, कंपनीस केलेला पत्रव्यवहार, खराब झालेल्या खाद्यपदार्थाचे फोटो यासह कागदपत्रे दाखल केली. यावर आयोगाने कुरियर कंपनीस सेवेतील त्रुटी व विलंबाबाबत खाद्यपदार्थाची एकूण किंमत, कुरियरचे चार्जेस व मानसिक त्रासापोटी एकूण 94 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
ही रक्कम 45 दिवसात न दिल्यास त्यावर सहा टक्के दराने व्याज आकारण्याचे देखील आदेशात नमूद केले आहे. तक्रार दाखल केल्यापासून पाच महिन्यात या प्रकरणाचा निकाल लागल्यामुळे ग्राहकांना आता न्याय मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही असे चित्र या प्रकरणातून स्पष्ट होते.
विलास लेले, राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत : ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहकाला वकील देण्याची आवश्यकता नाही. ग्राहक स्वतःची बाजू स्वतः मांडू शकतो. ग्राहकांची फसवणूक झाल्यास किंवा सेवेतील कमतरतेसाठी ग्राहकाने दाद मागणे जरुरीचे आहे. ग्राहक आयोगाकडे जलद न्याय मिळतो. तक्रार कुठेही घडली, तरी ग्राहक ज्या जिल्ह्यात वास्तव्यास आहे तेथे तक्रार दाखल करावी. फसवणूक झाल्यास ग्राहकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊन आपण आपले प्रश्न मार्गी लावावेत.