सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी जवळच्या शिदवस्ती येथील शेतकऱ्याच्या शेळी फार्म मधील अत्यंत रुबाबदार दिसणा-या बिटल जातीच्या बोकडाची व उस्मानाबादी शेळीची झालेल्या चोरीची चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू आहे.. विशेष म्हणजे या बोकडाचे वजन ८४ किलो असून त्याची किंमत ४० हजार रुपये आहे.. या बोकडाचे नाव ‘ शेरा ‘ असून काल रात्री या ‘ शेरा ‘ ला व शेळीला अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले.
शिद शेळी फार्मचे मालक अजय सुभाष शिद ( रा. शिदवस्ती, सरडेवाडी इंदापूर ) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात या चोरीबाबतची फिर्याद दिली आहे.. काल रात्री बारा ते पहाटे पर्यंत च्या सुमारास चोरी झाल्याचे अजय शिद यांनी महान्यूजला सांगितले.
सुमारे दोन वर्षे वयाचे बीटल जातीचे बोकड काळे रंगाची असून त्याच्या चेहऱ्याची ठेवण इतरांपेक्षा वेगळी होती. अजय शिर्के यांनी शेळी फार्म चालू करून फक्त एकच वर्ष झाले आहे.
शिद वस्तीच्या शेळी फार्म वर १४ लहान-मोठ्या शेळ्या,७ लहान-मोठी बोकडे असे एकूण २१ शेळ्या व बोकडे होती. काल सोमवारी ( दिनांक १४ ) रोजी सायंकाळी आठ वाजता शेळ्यांना चारा पाणी दिले गेले. आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास चारा टाकण्यासाठी गेले असता त्यांना जाळी तोडल्याचा प्रकार दिसून आला. आत मध्ये पाहिले असता सर्वात मोठा असणारा बोकड व मोठी शेळी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात असणाऱ्या वस्त्यांवर चौकशी केली असता त्यांना हे शेळी, बोकड दिसून आले नाही. अखेर अजय शिद यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दोन वर्षे वयाचे बीटल जातीचे बोकड व दोन वर्षे वयाची उस्मानाबादी शेळी चोरी गेल्याची फिर्याद दिली. साधारणपणे चाळीस हजार रुपये किमतीचे बोकड १८ हजार रुपयांची शेळी असा एकूण ५८ हजार रुपये किंमतीच्या शेळी व बोकडाची चोरी झाल्याचे अजय शिद यांनी फिर्यादी मध्ये म्हटले आहे.
इंदापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.