माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
क्रिकेटकडे अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून पाहिले जाते. या खेळात कधी काय होईल हे कोणताच ज्योतिषी सांगू शकत नाही. याचीच प्रचिती भोर तालुक्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात खेळाडूंसोबत सामना पाहणाऱ्यांनाही आली. सामन्यामध्ये असे काही घडले की त्याची आपण कल्पना देखील करु शकत नाही. विजयासाठी एका चेंडूत ४ धावांची गरज होती. फलंदाजाने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला आणि पै. धनेश डिंबळे यांचा डीडी स्ट्रायकर्स संघ विजयी झाला. संबंधीत घटना ही आंतरराष्ट्रीय खेळाशी निगडीत नसली तरीही मजेदार आहे.
भोर तालुक्यातील क्रिकेट प्रेमींनी एकत्र येत हरीश्चंद्री ( ता. भोर ) येथील प्रांगणात भोर चॅम्पियन ट्रॉफी २०२२ क्रिकेटचे फुलपीच सामने आयोजित करण्यात आले होते. शेवटच्या अंतिम सामन्यात डीडी स्ट्रायकर्सने बाजी मारली आणि प्रथम क्रमांकावर संघ विराजमान झाला. या विजेत्या संघाला रोख ७१ हजाराचे बक्षीस व मानाची ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते संघमालक पै. धनेश डिंबळे आणि त्यांच्या खेळाडूना देण्यात आली. यावेळी मैदानात डीडी स्ट्रायकर्सचा विजयाचा जयघोष घुमला. या सामन्यात अमृता साम्राज्य, चॅलेंजर, हिंमत बहादुर, आरएस रायझिंग स्टार, धाराऊ वॉरियर्स, नरवीर योद्धा यांची सुद्धा खेळी संस्मरणीय ठरली.
हरीश्चंद्री येथे पाच दिवसीय क्रिकेटचे सामने भरविले होते. या सामन्यात तालुक्यातील आठ नामवंत संघाने सहभाग घेतला होता. साखळी पद्धतीने झालेल्या सामन्यात कोंढाणा वॉरियर्स आणि डीडी स्ट्रायकर्स हे दोन संघ फायनलला पोहचले. यावेळी दोन्ही संघांमधील सामना अंगावर काटा उभा आणणारा झाला. यात डीडीआरएस स्ट्रायकर्स या संघाचा पॉईंटवर देखील वरचष्मा कायम राहिला होता. मात्र आता शेवटचा चेंडू आणि ४ धावा करायच्या होत्या. क्रिकेटचे चाहते आणि तज्ञ वेगवेगळे अंदाज लावत असतानाच कर्णधार जीतू शिंदे याने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला आणि या डीडी स्ट्रायकर्स संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला.
संघमालक पै. धनेश डिंबळे यांच्या नेतृत्वाखाली जितु शिंदे, वैभव चौधरी, अक्षय कोंढाळकर, साहिल वाडकर, रोहित किंद्रे, आकाश पांगारे, आकाश सुकाळे, सागर गोगावले, गणेश डिंबळे, संतोष कारकर, रोहित लेकावळे, विठ्ठल वाडकर, ऋषी कोंडे, सचिन चंदनशीव, युवराज खुटवड या क्रिकेट खेळाडूंनी यशस्वी स्ट्रायकर्स करून प्रथम क्रमांकावर विराजमान झाले. त्याच्या विजयाबद्दल उपस्थित मान्यवर आणि क्रिकेट चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.