घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
जंगल नष्ट होऊ लागले, वन्य प्राणी आणि पक्षांची संख्या घटू लागली. चित्ता संपून गेला, माळढोकही संपला, वाघ फार थोडे उरले. अशा परिस्थितीत माणसाइतकाच एक चिवट वन्यप्राणी अजूनही जगण्याचा संघर्ष करतो आहे. जिथे दिसेल तिथे गोळ्या घाला या मागणीपासून माणसाशी संघर्षाचा याचा प्रवास आता आपल्या परिसरात पर्यटकांचे लोंढे आणण्यासाठी प्रमुख आकर्षण म्हणून करण्याच्या माणसांच्या प्रयत्नापर्यंत पोचला आहे.
बिबट्याच्या या जगण्याच्या जिद्दीला खरेच सलाम ठोकला पाहिजे. जंगलातील आसरा कमी होत चालला, हिंडण्या फिरण्याच्या जागा संपल्या, खाद्य कमी होत चालले. त्यावेळी अनेक वन्य पशूंनी जगण्याची आसच सोडली. मात्र हा पठ्ठ्या थेट माणसांच्या जंगलातच रहायला आला. मानवनिर्मित ऊसाच्या शेतीच्या जंगलाला त्याने आपलेसे केले, तिथेच त्याची पोरेबाळे वाढू लागली. आसपासच्या परिसरातील प्राण्यांवर भागले नाही तर गावात शिरून तिथल्या कुत्र्यांवर झडप घालू लागली. त्यावरही नाही भागले तर थेट माणसांवर हल्ला करण्याचीही तयारी त्याने ठेवली. बदललेल्या परिस्थितीप्रमाणे स्वत:ला बदलविण्याच्या माणसाच्या क्षमतेसोबत त्याने जणू स्पर्धाच सुरु केली.
पुणे जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर पहिल्यांदा जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढू लागली. डोंगराळ भाग, ऊसाची शेती, जवळच असलेले जंगल यामुळे त्याला अनुकुल अधिवास लाभला. जवळपास २५ वर्षे जुन्नर परिसरात बिबट्यांचे वास्तव्य आहे. आज घडीला जुन्नर तालुक्यात ६०० पेक्षा जास्त बिबटे असल्याचा अंदाज आहे. या बहुतेक काळात बिबट्याला माणसाचा शत्रू म्हणूनच ओळखले गेले आहे. त्याने पाळीव गुराढोरांवर हल्ले केले, त्याने माणसांवर, लहान मुलांवर हल्ले केले. भरदिवसा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करण्यापर्यंत त्याची मजल गेली. त्यामुळे ‘ दिसताक्षणी गोळ्या घाला, अजिबात दयामाया दाखवू नका ‘ अशा मागणीपासून ‘ आधी माणसांचे रक्षण करा, मग बिबट्या वाचवायचे बघा. ‘ पर्यंत बिबट्याच्या विरोधातील आक्रोश उंचावत गेला.
पिंजरे लावून बिबटे पकडण्याच्या मोहीमा सुरु झाल्या. जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे अशा पकडलेल्या बिबट्यांना ठेवण्यात येऊ लागले. कायद्यानूसार बिबट्याला दिर्घकाळ पिंजऱ्यात ठेवता येत नाही, त्यामुळे काही काळाने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाऊ लागले.
अर्थात बिबट्यांना माणसांनी तयार केलेल्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या सीमा माहिती असण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यांनी केव्हाच जुन्नरची सीमा ओलांडली. आता पुणे जिल्ह्यातील बहुतेक सगळ्या तालुक्यात प्रवेश केला. प्रत्येक तालुक्यातून बिबट्या दिसल्याच्या, त्याने केलेल्या हल्ल्यांच्या बातम्या झळकू लागल्या.
इथपर्यंत जे काही लिहिले आहे, ती आजच्या विषयाची प्रस्तावना होती. प्रस्तावना थोडी जास्तच झाली, पण हरकत नाही, आता आजच्या विषयावर येऊ.
माणसाचा शत्रू म्हणून ओळख मिळविलेल्या बिबट्याचा वापर करून पर्यटकांचा लोंढा तालुक्यात आणण्याच्या ‘ बिबट्या सफारी ‘ प्रकल्पाची चर्चा गेल्या काही वर्षापासून सुरु होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला यावर्षीच्या अर्थसंकल्पात स्थान दिले. याचबरोबर हा प्रकल्प बारामती तालुक्यात साकारण्याचेही जाहीर केले.
आता हा प्रकल्प नेमका आहे तरी काय याची थोडी माहिती घेऊ.
अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हा बिबट्यांसाठीचा ‘ खुला तुरुंग ‘ आहे. बारामती तालुक्यातील या प्रस्तावित बिबट्या सफारीची जी थोडीशी संकल्पना वन विभागाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेली आहे, त्यावरून बारामती तालुक्यातील गाडीखेल आणि शिर्सुफळ गावाच्या आसपासच्या १०० हेक्टर जमिनीचा वापर या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. वनखात्याने जरी प्रसिद्धीपत्रकात म्हणले नसले तरीदेखील ही जमीन वनखात्याच्या ताब्यात असणारीच असावी असा अंदाज लावण्यास काही हरकत नाही. या जागेभोवती मोठी भिंत उभारायची आणि ही जागा बंदिस्त करायची. त्यानंतर ठिकठिकाणी वनखात्याने पकडलेले बिबटे या जागेत आणून सोडण्याची योजना आहे. अर्थातच या ठिकाणी बिबट्यांना नैसर्गिक खाद्य उपलब्ध होण्याची फारशी शक्यता नसल्याने वनखाते त्यांना खाद्य पुरविणार आहे. या बिबट्यांना पाहण्यासाठी पर्यटकांना आमंत्रित करायचे, त्या निमित्ताने पर्यटन व्यवसायाला चालना द्यायची असा साधारणपणे हा प्रकल्प आहे.
भविष्यकाळात बिबट्यांच्या जोडीला वाघ, हत्ती किंवा आणखीही काही प्राणी या जागेत आणले जाऊ शकतात. हा प्रकल्प अर्थसंकल्पातून जाहीर झाला असला तरी या प्रकल्प अजूनही संकल्पनेच्याच पातळीवर आहे. वन्य प्राण्यांशी संबंधित कोणत्याही प्रकल्पाला केंद्र सरकारच्या अनेक मंजुऱ्यांची गरज पडते. या प्रकल्पासाठी त्या घेण्यात आलेल्या आहेत की नाही याबाबत अजून स्पष्टता नाही. या प्रकल्पासाठीची नेमकी जागाही अद्याप निश्चित नाही.
त्यामुळे घोषणा झाली असली तरीदेखील प्रकल्प प्रत्यक्षात येण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.
बिबटे आणि माणूस यांच्यातील संघर्ष आणि सहचर्याच्या प्रवासातील हा एक महत्वाचा टप्पा आहे. पहिल्यांना माणसांनी बिबट्यांच्या अधिवासांवर आक्रमण केले. त्यानंतर बिबटे माणसांच्या अधिवासात येऊन आक्रमण करु लागले. वन्य जीव हे मनुष्यजात नष्ट करण्याची क्षमता हरवून बसल्यानंतर आणि माणसाकडूनच नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्यांना वाचविण्याचे हाकारे सुरु झाले. त्यांना ठार मारण्यावर अनेक बंधने आली. आताही बिबटे आणि माणूस यांच्यातील संघर्षात बिबट्याच्या बाजूने माणसांनी बनविलेले अनेक कायदे आहेत. या कायद्याने बिबट्याला ना पिंजऱ्यात ठेवण्यात येते, ना ठार मारता येते. दुसरीकडे बिबटे मात्र माणसे, गुरेढोरे यांच्यावर वाढत्या प्रमाणात हल्ले करू लागले आहेत.
या सगळ्यावरचा मध्यममार्ग म्हणजे हा बिबट सफारीचा प्रकल्प आहे.
आता बारामतीत होऊ घातलेल्या या प्रकल्पाला पहिला विरोध जु्न्नरमधून होऊ लागला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त बिबटे जिथे आहेत, तिथे हा प्रकल्प न होता बारामतीला केला जातो आहे, यााला जुन्नरचे माजी आमदार शरद सोनावणे यांनी विरोध केला आहे. याबाबत त्यांनी आमरण उपोषणाचा इशाराही दिला आहे. मनुष्यजातीच्या स्वभावाप्रमाणे या विषयातही आता राजकारणाने प्रवेश केला आहे. एकाच आघाडीत राहून सत्ता उपभोगणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आता ‘ बिबट्या माझाच ‘ असे म्हणत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
मात्र ज्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढते आहे, ते पाहता अशी बिबट्या सफारी भविष्यकाळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बारामतीत जर बिबट सफारी निर्माण होण्याची शक्यता तयार झाली तर जुन्नरलाही जवळपास त्याच वेळी ती होण्याची शक्यता आहे.
हे सर्व लिहत असताना एक आठवण झाली. पुर्वी बारामतीत एक ‘ सेंटलमेंट ‘ होती. इंग्रजी काळात काही जमातींना गुन्हेगार ठरविण्यात आले होते. या गुन्हेगार जमातींना त्यांच्या मुलाबाळांसह आणून या सेटलमेंटमध्ये ठेवण्यात येत असे. या सेटलमेंटभोवती एक तारेचे कुंपण होते. या कुंपणाच्या आतच या लोकांना रहावे लागत असे. इंग्रजी राज्य गेल्यावर या सेटलमेंटही संपविण्यात आल्या.
आता या बारामतीत बिबट्यांसाठी ‘ सेटेलमेंट ‘ उभी करण्याची चर्चा सुरु झाली आहे.