मुंबई : महान्यूज लाईव्ह
हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही, त्यामुळे शाळेमध्ये हिजाब घालून जाण्यास परवानगी देता येणार नाही, असा निकाल देत कर्नाटक उच्च न्यायालयाने या मागणीसाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींची याचिका रद्दबातल केली आहे.
गेल्या महिन्यात कर्नाटकामध्ये शाळा आणि महाविद्यालयात हिजाब घालून जाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावरुन अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळून शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली होती. उच्च न्यायालयातही हा विषय पोचला होता, त्यावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे.
आज या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर संबंधित दोन्ही पक्ष पुढे काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.