सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
देशात चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या पुष्पा चित्रपटात ‘ मै झुकेगा नही ‘ म्हणणारा पुष्पा आपण पाहिलाय.. मात्र इंदापूरचा भिंतीवर रंगवलेला पुष्पा सांगतोय ‘ मै झुकेगा नही.. लेकिन कचरा दिखेगा तो झुकेगा भी और डस्टबीन में डालेगा भी साला..’!! इंदापूरच्या नगरपालिकेने भिंती रंगवून स्वच्छता राखण्याचा संदेश देत केलेल्या अनोख्या प्रयोगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत इंदापूर नगरपालिकेने गेल्या पाच वर्षांमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वच्छते बाबतच्या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील बक्षिसे मिळवून इंदापूरचे नाव सर्वदूर पसरले आहे. स्वच्छ इंदापूर सुंदर इंदापूर बनवण्याचा ध्यास घेतलेल्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचे दिसून आले.
इंदापूरात नगरपालिका ही स्वच्छतेबाबत सतत प्रयत्नशील असते. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती व्हावी यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करणाऱ्या नगरपालिकेने सध्या बहुचर्चित ठरलेल्या पुष्पा चित्रपटातील गाजलेल्या ‘ झुकेगा नाही साला ‘ हा डायलॉग भिंतीवर रंगवत व पुष्पाचे चित्र दर्शवत नागरिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या युवकांमध्ये पुष्पाच्या डायलॉगची भुरळ पडली आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत लाखो चित्रपट शौकीनांनी याच्या रिल्स बनविल्या आहेत. त्यामुळेच हाच डायलॉग इंदापुरात नगरपालिकेने ट्रेंड केला आहे. पुष्पाच्या छायाचित्रासह लिहिलेल्या डायलॉगमुळे नागरिकांमुळे स्वच्छतेबाबत चांगला संदेश जाईल अशी अपेक्षा नगरपालिकेला वाटत आहे.