शिरूर : महान्युज लाइव्ह
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत शिवशक्ती सहकार विकास पॅनलने १३ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला.या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत पॅनलप्रमुख दादा पाटील फराटे व सुधीर फराटे यांनी आपल्या नेतृत्वाचा करिष्मा दाखविला आहे.
या निवडणुकीत वाघेश्वर सहकार आघाडी पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार विकास पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.या निवडणुकीत घोडगंगा कारखान्याच्या आजी माजी पाच संचालकांना पराभवाचा धक्का बसला.
मांडवगण फराटा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था ही शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात जुनी सहकारी संस्था आहे. या संस्थेचा तालुक्यात चांगला नावलौकिक आहे. या संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रथमच तीन पॅनल समोरासमोर उभे होते. त्यामुळे कधी नव्हे इतकी चुरस या निवडणुकीत पाहायला मिळाली. या निवडणुकीत १३ जागांसाठी तीन पॅनलचे ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे ही निवडणूक जिंकणे अनेकांना प्रतिष्ठेची होती. तालुक्यात अनेक मातब्बर नेते या निवडणुकीकडे डोळे लावून होते. या निवडणूक प्रक्रियेत प्रचार करण्यासाठी सर्व उमेदवारांना मोठा अवधी मिळाला होता. त्यामुळे जे बाहेरगावी असलेले मतदार होते त्यांची देखील या निवडणुकीत भूमिका महत्त्वाची होती. या निवडणुकीत एकूण मतदान २५८६ होते तर २०९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीत ७३ मते ही अवैध ठरली. रात्री उशिरापर्यंत मतदान अधिकारी व कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. पोलिसांच्या बंदोबस्तात ही निवडणूक शांततेत पार पडली. रात्री अकरा वाजता निकाल घोषित करण्यात आला.
या निवडणुकीत शिवशक्ती पॅनलचे नेतृत्व दादा पाटील फराटे, सुधीर फराटे यांनी केले. तर वाघेश्वर सहकार आघाडी पॅनलचे नेतृत्व मदनदादा फराटे, बापुकाका फराटे, माणिक फराटे, लतिका वराळे यांनी केले.
या निवडणूकीबाबत बोलताना विजयाचे शिल्पकार शिवशक्ती पॅनलचे प्रमुख दादा पाटील फराटे,सुधीर फराटे यांनी बोलताना सांगितले की, आम्ही आमचे उमेदवार निवडून आणण्यावर भर दिला. सर्वसामान्य सभासद आमच्या पाठीशी होता. त्यामुळेच एकहाती सत्ता मिळाली आहे. या पुढील काळात संस्था अधिक चांगल्या प्रकारे गतीमान करत अधिक प्रगतीसाठी प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले. सर्वांना सोबत घेऊन कामकाज केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
पॅनलचे नाव व उमेदवार
शिवशक्ती सहकार विकास पॅनल ;
१) शरद वाल्मीक गायकवाड, २) अमोल रामदास जगताप, ३) कैलास बापूराव फराटे, ४) गोविंद नामदेव फराटे, ५) संतोष वसंतराव फराटे इनामदार, ६) ज्ञानेश्वर वसंतराव फराटे पाटील, ७) मीनाक्षी दिलीप फराटे, ८) रुपाली दत्तात्रय फराटेपाटील, ९) हनुमंत शिवाजी राजगुरू १०) रामचंद्र नारायण सुतार, ११) बाळासाहेब बाबासो कोळपे
वाघेश्वर सहकार आघाडी पॅनल
( विजयी उमेदवार )
१) गणेश माणिकअण्णा फराटे
२) महादेव किसनराव फराटे
या दोन पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत.