राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातून गेलेला अष्टविनायक मार्गावर सध्या अनेक छोटे मोठे अपघातांच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम बहुतांश ठिकाणी पुर्ण झाल्याने भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहने आणि पडवी ते पाटस आणि पाटस ते सुपा पर्यंत अष्टविनायक रस्ता अंत्यत अरुंद असल्याने या रस्त्यावर जीवघेणे अपघात घडत आहेत. एका ऊस वाहतूक टॅक्टर चालकाचा आणि एका सात वर्षाच्या चिमकुलीचा बळी या रस्त्याने घेतला आहे. सध्या अष्टविनायक रस्ता मृत्युचा सापळा बनला असल्याचे चित्र आहे.
दोन दिवसांपुर्वी पडवी ते कुसेगाव अष्टविनायक रस्त्यावर पडवी हद्दीत स्कुल व्हॅन गाडी आणि मोटार कारची समोरा समोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका सात वर्षाच्या विद्यार्थीनीचा मृत्यु झाला तर एक विद्यार्थिनी जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली होती. तर दोन्ही वाहनांचे वाहनचालक यांनाही या अपघातात दुखापत झाली. तर सुपा, दंडवाडी व कुसेगाव या अष्टविनायक रस्तावरील पोईच्या घाटात काही महिन्यापुर्वी ऊस वाहतुक करणारा टॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटनाही घडली होती.
यापुर्वी हा स्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते आणि रस्त्याची दुरावस्था झाली होती. पण तेव्हा या रस्त्यावर गंभीर अपघातांच्या घटना फारशा घडत नव्हत्या.
मात्र काही महिन्यापुर्वी या रस्त्याचे अष्टविनायक मार्गात रूपांतर झाल्याने सुपा ते चौफुला रस्त्यावरील पडवी फाटा ते पाटस पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण झाले आहे. यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच वाहनांची वेग मर्यादाही दुपटीने वाढली आहे. हा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असून ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. तसेच अत्यंत अरूंद असा हा रस्ता आहे. दोन मोठी जड वाहनेही एकाच वेळी या रस्तावरून प्रवास करू शकणार नाहीत. दुचाकी व छोटी चारचाकी वाहनांनाही प्रवास करणे अत्यंत जिकरीचे बनत आहे.
ऊस वाहतुक करणारा टॅक्टर समोरून आल्यास दुसऱ्या वाहनांना बाजुला घेण्यासाठीही पुरेशा रस्ता नाही तसेच या टॅक्टरला ओलांडूनही पाठीमागून येणाऱ्या वाहनांना पुढे जाता येत नाही असे चित्र सध्या या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक अनुभवत आहेत. कुसेगाव येथे तर दोन्ही बाजुंकडून येणारे रस्ता हा थेट गावातून जात आहे. परिणामी कोणत्या बाजूने भरधाव वेगाने वाहने येतील हे सांगता येत नाही. परिणामी स्थानिक नागरीकांना जीव मुठीत घालून ये – जा करावी लागते.अत्यंत अरूंद रस्ता आणि भरधाव वेगाने धावणारी वाहने यामुळे या रस्त्यावर अपघातांच्या घटना वाढत आहेत.
या अष्टविनायक रस्त्यावर ठिकठिकाणी सांकेतिक,दिशादर्शक व मार्गदर्शक चिन्हांचे फलक लावले आहेत. वळण्याच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजुला पत्रा लावण्यात आले आहेत. साईट पट्याही मुरूम टाकून भरून घेतल्या आहेत. सुपा,मोरगाव,पाटस,दौंड,बारामतीला दळणवळण करण्यासाठी मधला आणि सोईस्कर रस्ता असल्याने आणि सध्या हा रस्ता चांगला झाल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रस्ता जरी चांगला असला तरी या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या वेगावर मात्र मर्यादा असावी, जेणेवरून जीव घेणे अपघातांच्या घटना टाळता येतील आणि प्रवास सुखकर होईल…