मुंबई : महान्यूज लाईव्ह
प्रेम आंधळ असत अस म्हणले जाते. कुणाचा कुणावर कधी, कुठे, कसा जीव जडेल हे सांगण मोठ कठीण आहे. कोणत्याही नियमात न बसणाऱ्या या प्रेमाचे आविष्कार पाहून माणस थक्क होऊन जातात. असही होऊ शकत, यावर विश्वासच बसत नाही.
आंधळ्या प्रेमापोटी सर्वस्व पणाला लावणाऱ्या एक महिलेची कथा सध्या पाटण्यात मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. राहुल आणि नगमा हे या प्रेमी जोड्याचे नाव आहे.
पाटणा शहरात एका मोबाईल शॉपीवर गुंडांनी लुटीच्या उद्देशाने गोळीबार केला होता. या घटनेच्या चौकशीत ही प्रेमकथा समोर आली आहे. राहुल आणि नगमा या दोघांनी हा गोळीबार केला होता. सीसीटिव्ही फुटेजमध्ये हे दोघे दिसून आल्यावर पोलीसांनी या दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत या प्रेमकथेचे रंग पुढे येऊ लागले.
नगमा एक विवाहित स्त्री. राहूल एक सराईत गुंड, शस्त्रांस्त्रांची तस्करी, खुनाच्या सुपाऱ्या घेण्याचा त्याचा उद्योग. ही नगमा या राहुलच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की नवरा आणी मुलाला घरी सोडून राहूलकडे आली. राहुलबरोबरच त्याच्या सगळ्या गुन्हेगारी कारवायातही सामील झाली. २०१५ पासून राहूल एका खुनाच्या आरोपाखाली ५ वर्षे तुरुंगात होता. त्यावेळी त्याच्या टोळीचे सगळे व्यवहार नगमाच पाहत होती. तुरुंगात असलेल्या राहुलच्या संपर्कात राहून त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर ती शस्त्रे पुरवत होती.
एक महिन्यापूर्वीच राहूल जामीनावर बाहेर आला होता. मोबाईल शॉपीतील तरुणाच्या खुनाची सुपारी राहुलला मिळाली होती. त्यासाठीच दोघांनी दुकानात गोळीबार केला होता.
यामध्ये आणखी विशेष म्हणजे नगमा विवाहित आहे हे सुरुवातीला राहुलला माहिती नव्हते. तिला घरातून पळवून आणल्यावर त्याने एका भाड्याच्या खोलीत ठेवले होते. लग्न न करताच ते एकत्र राहत होते. राहुल जामीनावर सुटून आल्यावर त्यांनी लग्न केले.
आता या आंधळ्या प्रेमिकांची पुढची बरीच वर्षे तुरुंगात जाणार आहे. कुठल्याही फुटपट्टीत आणि समाजनियमात न बसणाऱ्या या प्रेमकहाणीची संगती लावायची तरी कशी, हा तुमच्या आमच्यासमोरचा खरा प्रश्न आहे.