शिरूर : महान्युज लाइव्ह
संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या मांडवगण फराटा येथील सहकारी सोसायटीची निवडणूकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून तीन पॅनलचे ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.ही लढत तिरंगी होत असून या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा या सहकारी संस्थेचा पुणे जिल्ह्यात नावलौकिक आहे. या संस्थेस अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पहिल्यांदाच या संस्थेच्या निवडणुकीसाठी तीन पॅनल समोरासमोर उभे ठाकले आहेत. गेल्या महिनाभरात भेटीगाठी देण्यावर उमेदवारांचा मोठा भर होता. नुकतीच गावची यात्रा पार पडली होती. अनेक पाहुणे नातेवाईक या यात्रेला आले असताना देखील उमेदवारानी मतदारांचे घर न घर देखील यात्राकाळात पिंजून काढले. बाहेरगावी असलेले मतदार यात्रेच्या काळात आवर्जून बोलावण्यात आले होते. यात्रा संपताच तीनही पॅनल निवडणुकीच्या प्रचारात जीवाची बाजी लावत प्रचार करत होते.
रविवारी दि.१३ रोजी सकाळपासून मतदान प्रक्रिया मतदान केंद्रावर सुरू झाली होती. सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. तीन पॅनलचे ३९ उमेदवार रिंगणात असल्याने आपला उमेदवार शोधताना मतदार चांगलाच गोंधळून जात होता.निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने अनेक महिला देखील प्रचारात सक्रिय झाल्या होत्या. सकाळपासून महिला देखील मतदान केंद्रावर ठाण मांडून बसल्या होत्या.
या निवडणुकीत नातीगोती,सगेसोयरे तीनही पॅनल मध्ये उभे असल्याने आता मतदान करायचं तर कुणाला ? असा प्रश्न मतदारांना पडला होता.
जो तो उमेदवार आपलाच पॅनल निवडून येणार असल्याचे ठामपणे सांगत होता. पहिल्यांदाच सोसायटीची निवडणूक तिरंगी होत असल्याने एकीकडे उमेदवारांचे दिवाळे तर मतदारांची दिवाळी होणार असल्याची चर्चा जागोजागी रंगू लागली आहे.
मांडवगण फराटा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत कधी नव्हे इतकी चुरस निर्माण झाली असून अनेक मोठ्या नेत्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
मांडवगण फराटा सोसायटीच्या निवडणुकीसाठी रविवारी दि. १३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी मतदान केंद्रावर केली जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता मतदानप्रक्रिया बंद झाली असून २०९२ मतदारांनी मतदान केले.