मुंबई : महान्यूज लाईव्ह
बंगाली चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ताला काल ( शनिवारी ) पोलिसांनी अटक केली. पाकिटमारीच्या आरोपावरून तिला अटक करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय कोलकता बुक फेअरमध्ये पोलिसांना एक महिला कचऱ्यामध्ये पर्स फेकताना आढळली. यामुळे आलेल्या संशयावरून पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान या महिलेकडे अनेक पर्स आणि रोख ७५ हजाराची रक्कम आढळून आली.
या चौकशीतच ही महिला एक सुप्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ता असल्याचेही उघड झाले. याच रुपा दत्ताने काही वर्षापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.
रुपा दत्तानेही पोलिसांपुढे पाकिटमारीची कबुली दिली आहे. यापुर्वीही जिथे लोकांची गर्दी असते, अशा मेळाव्यात आणि इव्हेंटमध्ये जाऊन तिने अशाच प्रकारे पाकिटे आणि पर्सची चोरी केली असल्याचेही तिने सांगितले आहे. या खुलाशाने पोलिसही चक्राऊन गेले आहेत.
रुपा दत्ता बंगालीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक चित्रपट आणि टिव्ही सिरीयल्समध्येही तिने काम केले आहे. याखेरीज एका सिरियलमध्ये तिने माता वैष्णो देवीची भुमिका केली होती. तिच्या इन्स्टाग्रामवरून मिळालेल्या माहितीनूसार ती स्वत:ला लेखक, दिग्दर्शक आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणवून घेताना दिसते.
अशा प्रसिद्ध व्यक्तीने पाकीटमारी का केली असावी, या पश्नाचे उत्तर आता कोलकता पोलिस शोधत आहेत.