वीज मंडळाला देणे असलेल्या १५ हजार कोटींतील १५ पैसे सुद्धा राज्य सरकारने वीज मंडळाला दिले नाही.. हर्षवर्धन पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात
सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
महाविकास आघाडी सरकारने नुकताच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी तरतुद असेल असे वाटत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे काहीच निर्णय घेतले नसल्याचे दिसत आहे, ठराविक मंत्री व त्यांची खाती डोळ्यासमोर ठेवून फक्त त्यांच्या स्वार्थासाठीच तयार केलेला हा अर्थसंकल्प आहे, असा घणाघाती आरोप भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी काढलेल्या नोटीस संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिस ठाण्यासमोर पदाधिकार्यांनी छेडलेल्या आंदोलना दरम्यान हर्षवर्धन पाटील पत्रकारांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, हा अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आणि कोणालाही कसल्याही प्रकारची मदत नसणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांकरता काहीतरी तरतूद असेल अशी आशा होती. मात्र ती निष्फळ ठरली. सध्या राज्यामध्ये विजेचा प्रश्न हा ऐरणीचा मुद्दा असून राज्य सरकारने वीज मंडळ करिता १० ते १५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची गरज होती. वीज मंडळ म्हणते आमच्याकडे कोळसा नाही, इंधन नाही,पगार करायला पैसा नाही. आमच्याकडून घेतलेल्या विजेचे पैसे द्यायला तयार नाहीत. मग वीज मंडळाचे राज्य सरकारकडे पंधरा हजार कोटी रुपयांचे देणे आहे सरकारने त्या पंधरा हजार कोटी पैकी पंधरा पैसे सुद्धा दिले नाहीत.आता तो सरकारचा प्रश्न आहे.
मात्र हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक असल्याचे पाटील म्हणाले.