मुंबई : महान्यूज लाईव्ह
सौदी अरेबियात एकाच दिवसात म्हणजे काल शनिवारी ८१ जणांना मृत्यूदंड देण्यात आला आहे. एक देश म्हणून निर्मिती झाल्यानंतर एकाच दिवशी मृत्यूदंड दिला गेलेल्यांची ही सर्वात मोठी संख्या आहे.
मृत्यूदंड दिल्या गेलेल्यांमध्ये दहशतवादाशी संबंधित लोकांचा मोठा भरणा आहे. १९७९ मध्ये मक्का येथील काबावर दहशतवादी हल्ला चढविणाऱ्या ६३ जणांचा समावेश आहे. याखेरीज अल – कायदा दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचाही यामध्ये समावेश आहे. येमेनमध्ये सौदी अरेबियाविरोधात लढणाऱ्या हौती बंडखोरांच्या ७ सैनिकांचाही यात समावेश आहे.
जगात सगळीकडे फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी प्रयत्न होत असताना एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना मृत्यूदंड देण्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे.
सौदीचे राजपुत्र मोहंमद बिन सलमान हे एकीकडे देशाला आधुनिकतेकडे नेत असल्याचे सांगत आहेत. कडव्या विचारांपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत आहेत, पण दुसरीकडे मृत्यूदंडासारखी शिक्षा इतक्या मोठ्या प्रमाणात दिली जात आहे, याकडे टिकाकार लक्ष वेधत आहेत.
मात्र मोहंमद बिन सलमान यांनी कुराणाने दुसऱ्याचा जीव घेणारांसाठी मृ्त्यूदंडाचीच शिक्षा दिलेली आहे, जरी इच्छा असली तरी मी यामध्ये बदल करू शकत नाही, असे म्हणले आहे.
या ८१ जणांना कशा प्रकारे मृत्यू देण्यात आला आणि ही शिक्षा कोणत्या ठिकाणी अंमलात आणण्यात आली याबाबत मात्र काहीही माहिती देण्यात आलेली नाही.