इंदापूरात आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत केला निषेध..! मंत्र्यांचे घोटाळे बाहेर निघतील या भितीने आघाडी सरकारकडून सुडाचे राजकारण..–
सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर इंदापूरात भाजप आक्रमक झाली आहे. फडणवीसांची पोलिसांकडून केली जात असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ आज सकाळी भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने इंदापूर पोलीस ठाण्या बाहेर घोषणाबाजी करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
फडणवीस यांना मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने ११ मार्चला नोटीस बजावली असून, चौकशीसाठी बीकेसी येथे बोलावले आहे.फडणवीसांना पाठविण्यात आलेली नोटीस ही बेकायदेशीर असून महाविकास आघाडी सरकार मधील अनेक मंत्री व नेत्यांचे बरेच घोटाळे उघडकीस येत आहेत. फडणवीस आणखी घोटाळे बाहेर काढतील, त्यामुळे भाजपा नेत्यांना नामोहरम करण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारचे सुडबुध्दीचे राजकारण चालू आहे, असा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. ज्यांनी घोटाळा झाल्याचे उघड केले, त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलवणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला मार अशी गत झाली आहे,असे सांगत हर्षवर्धन पाटील यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी महाआघाडी सरकारचा जाहिर निषेध केला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, मारुती वनवे, कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा, माजी सभापती विलास वाघमोडे, गटनेते कैलास कदम, शहराध्यक्ष शकिल सय्यद, इंदापूर अर्बनचे चेअरमन देवराज जाधव, बापू जामदार,आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे यांसह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.