मुंबई : महान्यूज लाईव्ह
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा प्रचंड विजय झाला. पण अजून नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांचा शपथविधी झालेला नाही. परंतू त्यापूर्वीच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे.
पंजाबमधील १२२ राजकारण्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय आज पंजाबचे डीजीपी व्ही. के. भवरा यांनी घेतला. कालच भगवंत मान यांनी त्यांची भेट घेतली होती. ज्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली, त्यामध्ये बहुतेक पंजाब कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. यामध्ये माजी मंत्री तसेच विधानसभेच्या माजी सभापतींची नावे आहेत. मनप्रीतसिंग बादल, राज कुमार विर्क, भारत भूषण आशू, रणदिपसिंह नाभा यासारख्या नेत्यांची नावे आहेत.
या यादीनूसार सर्वात जास्त म्हणजे २१ पोलिसांची सुरक्षा माजी परिवहन मंत्री अमरिंदर सिंग राजा वारिंग यांना होती. १९ पोलीसांची सुरक्षा माजीअर्थमंत्री मनप्रीत बादल यांना, १७ पोलीसांची सुरक्षा माजी शिक्षण मंत्री परगत सिंग यांना, १६ पोलीसांची सुरक्षा माजी अन्न मंत्री भारत भूषण आशू यांच्याकडे होती. प्रत्येकी १५ पोलीस संगतसिंग गिलझान आणि रणदीपसिंह नाभा यांच्यासाठी सुरक्षा पुरवत होते.
हे सर्व मंत्री या निवडणूकीत पराभूत झाले आहेत. आता या सगळ्यांची सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे.
पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीच्या सुरक्षाव्यवस्थेत ६ पोलीस होते. अकाली दलाचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या जावयाच्या सुरक्षेत ३ पोलीस होते. आम आदमी पक्षात यापुर्वी असलेले पण यावेळेस निवडणूक न लढविलेले किंवा दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवून हरलेल्या तीनजणांकडेही पोलिस सुरक्षा होती. ही सर्व सुरक्षा व्यवस्था आता हटविण्यात आली आहे.
नेत्यांना सुरक्षेच्या कामातून मुक्त झालेल्या या पोलिसांना त्यांच्या मूळच्या जागेवर जावून वरिष्ठांपुढे हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.