पुणे : महान्यूज लाईव्ह
सायबर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना तांत्रिक मदत लागते. या क्षेत्रातील तज्ञांना पोलिस मदतीला बोलावतात. पण आता अशा मदतीला आलेल्यांनीच पोलिसांनी दिलेल्या माहितीचा गैरवापर केला असल्याची माहिती पुढे आली आहे.
पंकज प्रकाश घोडे ( रा. ताडीवाला रोड ) व रवींद्र प्रभाकर पाटील ( रा. बिबवेवाडी ) या दोन सायबर तज्ञांना पोलीसांनी अटक केली आहे. पाच वर्षापूर्वी पुण्यात बिटकॉईन चलनामध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने असंख्य नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती. याबाबत दत्तवाडी आणि निगडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पंकज घोडे आणि रवींद्र पाटील यांची मदत घेतली होती.
या प्रकरणात पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी अमित भारव्दाज याच्यासह १७ आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून फक्त २४१ बिटकॉईन जप्त केले होते. परंतू या सगळ्या प्रकरणात मदत करणाऱ्या सायबर तज्ञांची भुमिका पोलिसांना संशयास्पद वाटू लागली. त्यामुळे २०२० मध्ये या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आली. यामध्ये संबंधित गु्न्ह्याच्या तांत्रिक तपासाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. यातून संबंधित सायबर तज्ञांनी केलेल्या असंख्य संशयास्पद गोष्टी पुढे आल्या.
सायबर पोलिस ठाण्याच्या तत्कालिन पोलिस अधिकाऱ्यांनी या तपासासाठी बिटकॉईनसंबंधीचा महत्वपूर्ण डेटा घोडे आणि पाटील यांना दिला होता. याचा गैरफायदा घेऊन पाटील याने एका आरोपीच्या वॉलेटमधील बिटकॉईन स्वत:च्या वॉलेटमध्ये वर्ग करून घेतल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले. आतापर्यंत पाटील याने ६० पेक्षा जास्त बिटकॉईन स्वत:सह इतर साथीदारांच्या वॉलेटवर वर्ग केले आहेत.
बिटकॉईन फसवणुक प्रकरण घडले त्यावेळी रश्मी शुक्ला पुण्याच्या पोलिस आयुक्त होत्या. घोडे हा शुक्लांचा निकटवर्तीय होता. त्याने पोलिस अधिकाऱ्यांची दिशाभूल करून पंचनामे करताना आरोपींच्या वॉलेटमधील ब्लॉकचेनचे स्क्रीनशॉट बनावटीकरण केले. हेच बनावट स्क्रीनशॉट खरे असल्याचे भासवून त्याने तपासासाठी सादर केले. तसेच वॉलेटमधील सगळे बिटकॉईन जप्त न करता त्यात काही बिटकॉईन शिल्लक ठेवून शासनाची फसवणूक केली असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. घोडे याने १०० पेक्षा जास्त बिटकॉईन स्वत:च्या नावावर केले आहेत.
रवींद्र पाटील हा आयपीएस अधिकारी होता. त्याने संबंधित नोकरीचा राजीनामा देऊन सायबरतज्ञ म्हणून काम सुरु केले होते.
या सगळ्या घडामोडीत आता संबंधित सायबर तज्ञांसोबत तत्कालिन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांचेही नाव घेतले जात आहे हेदेखील वैशिष्ठपूर्ण आहे.