इंदापूर : महान्यूज लाईव्ह
भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील तीन अनोळखी सुरक्षारक्षकांनी ट्रॅक्टर चालकाला पाइप व बांबूने मारहाण केली. या संदर्भात वालचंदनगर पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तीन अनोळखी सुरक्षारक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इंदापूर तालुक्यातील चिखली येथील भिमराव श्रीमान डोंबाळे या 50 वर्षीय चालकाने यासंदर्भात भवानीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमराव डोंबाळे हे नितीन माने यांच्या ट्रॅक्टरवर ऊस तोडणी व वाहतूक करतात. 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता नितीन माने यांचा ट्रॅक्टर घेऊन कुरवली गावातील पांढरे यांच्या शेतात डोंबाळे गेले असता कामगारांनी दिवसभर तोडलेला ऊस ट्रॅक्टर मध्ये भरून दिला.

हा ट्रॅक्टर भवानीनगर येथील छत्रपती कारखान्यावर आणल्यानंतर डोंबाळे यांनी रस्त्यावर लावला व नंबर लावून कारखान्याच्या वजन काट्यावर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गेल्यानंतर तेथील पर्यवेक्षकांनी आता ट्रॅक्टर खाली होणार नाही असे सांगितले. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाने तुम्ही मला पैसे द्या, मी तुमच्या ट्रॅक्टर लगेच खाली करतो असे सांगितले.
तेव्हा डोंबाळे यांनी मी तुमच्या वरिष्ठांना सांगतो असे म्हणत तिथून कारखान्याकडे निघाले असता, तेथे ड्युटीवर असलेल्या तीन अनोळखी सुरक्षारक्षकांनी शिवीगाळ केली व कारखान्याच्या आतमध्ये नेऊन फायबरच्या पाईप व बांबूच्या काठीने बेदम मारले. अशी फिर्याद डोंबाळे यांनी पोलिसांकडे दिली. त्यावरून अज्ञात तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वालचंदनगर पोलिस करत आहेत.