राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या मळद तलावात कुरकुंभ हद्दीत सुरू असलेल्या खुलेआम बेकायदा वाळू उत्खन्नामूळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी ( पाईप ) फुटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकाराबाबत स्थानिक महसूल कर्मचारी व पोलीस प्रशासन यांना सातत्याने सांगुन ही संबंधित वाळू माफियांवर कसलीच कारवाई केली जात नाही असा आरोप या भागातील शेतकरी करीत आहेत. दरम्यान, मळद तलाव व तलाव परिसरात सुरू असलेल्या खुलेआम वाळू उपसावर महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला माहिती नाही की त्यांच्यावर कारवाई करायची नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत मळद येथील तलाव परिसरात मागील एक दिड महिन्यापासून जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळू उत्खनन सुरू आहे. रात्रीच्या वेळी तलाव परिसरात पाच सहा जेसीबी मशीनी वाळू उपसा करण्यासाठी उतरतात. तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेतपिकांसाठी पाणीपुरवठा करणाऱ्यासाठी पाईप ( जलवाहिनी ) टाकुन पाणी नेले आहे. सध्या तलावातील पाणी साठा कमी झाला आहे. तसेच तलावात पाणी येणाऱ्या ओढ्यांचे पात्र कोरडे पडले आहे. यामुळे वाळू माफिया वाळू काढण्यासाठी सक्रिय झाले आहेत. जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळू उत्खनन करताना अनेक शेतकऱ्यांच्या जलवाहिनी फुटल्या आहेत तर अनेक शेतकऱ्यांच्या जलवाहिनी खड्डे पडल्याने उघड्या पडल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित वाळू उत्खन्न करणारे वाळू माफिया नुकसान भरपाई तर सोडाच, उलट शेतकऱ्यांनाच दमदाटी करीत आहेत. शेतकऱ्यांचे अंतर्गत रस्त्यावर वाळू करणारी वाहनांची वर्दळ वाढली असल्याने शेतकऱ्यांना शेतात काम करणे आणि शेतमाल ने आण करणे अवघड झाले आहे. तसेच तलावात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर ठिकठिकाणी वाळूचे साठा केल्याचे चित्र आहे.
हे वाळू माफिया आणि प्रशासन यांचे लागेबांधे असल्याने तक्रार करण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. नावं न छापण्याचे अटीवर शेतकरी हा प्रकार सांगत आहेत. खुलेआम बेकायदा वाळू उत्खलन सुरू असुनही संबंधित व्यक्तींवर प्रशासन कारवाई का करीत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या प्रकराकडे लक्ष घालून संबंधित वाळू माफियांच्या मुसक्या आवळाव्यात अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.