पुणे : महान्यूज लाईव्ह
भारती विद्यापीठ कन्या प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन, महिला दिन आणि इ.१० वी शुभेच्छा समारंभ यांचे आयोजन करण्यात आले होते. याच प्रशालेची माजी विद्यार्थिनी , शिल्पा रुपनवर ( सहायक वनसंरक्षक ) व योगिता गोसावी, ( पुणे शहर चिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सांस्कृतिक विभाग ) या दोघी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सिंधू जाधव व प्रमुख पाहुण्या यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे व सरस्वती पूजन करण्यात आले.
शाळेतील शिक्षिका कुमठेकर यांनी ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक सावंत सर यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापिका यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवकांचा सत्कार विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आला. परीक्षा विभागाचे प्रमुख कलशेट्टी सर यांनी परीक्षेचे नियोजन थोडक्यात सांगितले. दहावीच्या विद्यार्थिनींनी शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल व मुख्याध्यापिका जाधव यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या योगिता गोसावी यांनी विद्यार्थिनींना शिक्षकांसोबत व शाळेसोबतचे नाते कायम ठेवून समाजात चांगली वर्तणूक ठेवून शाळेचे नाव उज्वल करा असे सांगून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. शिल्पा रुपनवर यांनी त्यांच्या मनोगतात संस्थापक डॉ. पतंगरावजी कदम यांचे ऋण व्यक्त करून सकारात्मक ऊर्जा शाळेने व शिक्षकांनी दिलेली आहे याबद्दल ऋण व आभार व्यक्त केले.
मुख्याध्यापिका सिंधू जाधव यांनी विद्यार्थिनींना उत्तम मार्गदर्शन करून शाळेचे, संस्थेचे नाव मोठे करा असे सांगून प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिक जाहीर केले . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक साटपे सर यांनी केले.