बारामती : महान्यूज लाईव्ह
परभणीहून बारामतीत मजुरीच्या कामासाठी आलेल्या कुटुंबातील लहान मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने सारे कुटुंब हवालदिल झाले होते. मात्र बारामती शहर पोलिसांमध्ये तक्रार देताच अवघ्या दोन तासाच्या आत पोलिसांनी मुलीला शोधून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
भरत साबळे हे मूळ परभणी जिल्ह्यातील भाडले साबळेवाडी येथील असून मजुरीच्या कामासाठी ते बारामती येथे आले आहेत. सध्या ते राहण्यास बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथे आहेत. ते शेतामध्ये मजुरीसाठी गेले असता त्यांची ६ वर्षाची मुलगी भाग्यश्री एकटीच घरी होती. खेळण्यासाठी बाहेर गेली असता घरचा रस्ता चुकल्याने ती तांदुळवाडी गावातून हरवली होती.
भारत साबळे यांनी भाग्यश्री सापडत नसल्याचे पाहून बारामती शहर पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार संजय जगदाळे, पोलीस हवालदार गोपाळ ओमासे, पोलीस कॉन्स्टेबल शाहू राणे तसेच पोलीस कॉन्स्टेबल नीता किर्धक या सर्वांनी मुलीच्या वडिलांना आधार देऊन सगळीकडे मुलीचा शोध घेण्यास सुरवात केली.
पोलीसांच्या मदतीने अवघ्या २ तासात भाग्यश्री सापडली. तिला तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कामगिरीबद्दल सर्व पोलीस यंत्रणेचे नागरीक आभार व्यक्त करत आहेत.