राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातून गेलेल्या पडवी – कुसेगाव अष्टविनायक मार्गावर पडवी हद्दीत स्कूल बस व खाजगी कार या वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात स्कूल बसमधील एक विद्यार्थिनी जागीच ठार झाली असून एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याने तिला पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे, अशी माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.
पडवी – कुसेगाव अष्टविनायक रोडवर पडवी हद्दीत आज शनिवारी ( दि. १२) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान विद्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस व खाजगी कार वाहन यांच्यात समोर समोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये पाटस येथील अवनी गणेश ढसाळ ( वय ७) ही विद्यार्थिनी जागीच ठार झाली तर मरीन तांबोळी ( पुर्ण नाव व पत्ता समजू शकले नाही ) या विद्यार्थिनीला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.या अपघातात दोन्ही वाहनांच्या वाहनचालक किरकोळ दुखापत झाली आहे. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे,पोलीस कर्मचारी घनश्याम चव्हाण, समीर भालेराव आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत स्कूल बस चालक अपघातातील बस घेऊन फरार झाला होता तर खाजगी कार घटनास्थळी उभी होती. अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पाटस पोलीस पुढील तपास करीत आहे.