कर्जत : महान्यूज लाईव्ह
नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सावकारांची पाळेमुळे उखडून काढण्याचा निर्धार पोलिसांनी केला असला, तरी सावकारांनी जे मुळे घट्ट धरून ठेवलेली आहेत, त्याची एकेक प्रकरणे तोंडात बोटे घालायला भाग पाडत आहेत. कर्जत तालुक्यातील धांडेवाडी व शिंदेवाडी येथील सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यावेळी या सावकारांनी तब्बल 120 टक्के व्याज दरसाल दर शेकडा आकारण्याचा महापराक्रम केलेला उघडकीस आला आहे.
अशोक खानवते (रा. भांडेवाडी ता.कर्जत) या शेतकरी व ऊस वाहतूकदार फिर्यादीने आपल्या तरकारीच्या व्यवसायासाठी विकास परमेश्वर तोरडमल (रा.शिंदेवाडी ता.कर्जत) या ओळखीच्या खाजगी सावकाराकडून डिसेंबर २०२० रोजी ६५ हजार रुपये प्रती महिना १० रुपये टक्के व्याजदराने घेतले होते.
फिर्यादी खानवटे यांनी दर महिन्याला ६ हजार ५०० व्याजाची रक्कम कधी रोख तर कधी अकाउंटवर जमा केली होती. त्यानंतर सन २०२० मध्ये उसाच्या टोळीला पैसे कमी पडल्याने फिर्यादीने आपल्या ओळखीच्या योगेश राजेंद्र धांडे (रा. धांडेवाडी ता.कर्जत) या खाजगी सावकाराला पैसे मागितले असता, त्याने २ लाख ५० हजार रक्कम १० रुपये टक्के प्रतिमहिना व्याजदराने दिली.
महिन्याला २५ हजार अशी वर्षभर व्याजाची रक्कम फिर्यादीने धांडे याला दिली.त्यानंतर फिर्यादीकडे पैसे आल्याने रोख स्वरूपात १ लाख ५० हजार रुपये धांडे यास ऑगस्ट २०२१ रोजी दिले. त्यानंतर दि.२९ सप्टेंबर २०२१ रोजी १ लाख रकमेचा चेक दिला व खात्यावरील तेवढी रक्कम कमी झाली आहे. मुद्दलीची पुर्ण रक्कम व व्याजाची २ लाख ७० हजार अशी एकूण ५ लाख २० हजार रक्कम देऊनही अजुन ३० हजारांची मागणी करून धांडे त्रास देत होता.
तसेच विकास तोरडमल या सावकाराला व्याजापोटी ९६ हजार देऊनही अजुन १ लाख ७० हजार रुपयांची मागणी करून शिवीगाळ करत होता. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी धांडे व तोरडमल या दोन्ही सावकारांनी फिर्यादीच्या घरी येऊन सर्वांसमोर मारहाण करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. ‘तु आमचे व्याजाचे पैसे दिले नाही तर तुझा काटा काढल्याशिवाय राहणार नाही’ अशी धमकी दिली.
त्यानंतर जिथे भेट होईल तिथे ते पैशाची मागणी करून दमदाटी करत होते. दरम्यान योगेश धांडे याने वडिलांच्या नावे दिलेल्या धनादेशापैकी एक धनादेश परत केला व दुसरा धनादेश ३० हजार दिल्यावरच देतो असे सांगितले. त्यानंतर दोन्ही सावकारांनी संगनमताने २९ जानेवारी २०२२ रोजी धनादेश भरला.
‘तुमच्या दोघांचे माझ्याकडे ९५ हजार आहेत, मी तुम्हाला देऊन टाकतो, पण वडिलांच्या नावे भरलेला धनादेश परत द्या’ असे म्हणून त्यांना विनंती केली. २७ फेब्रुवारी रोजी त्यांनी फिर्यादीच्या वडिलांच्या नावे ३ लाखाचा धनादेश बँकेत भरला. तो बाऊन्स झाला असल्याचे फिर्यादिस समजले.
त्यानंतर फिर्यादीने रितसर कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असुन दोन्ही सावकारावर भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, पोलीस अंमलदार सलीम शेख, प्रवीण अंधारे, उद्धव दिंडे, सचिन वारे, शाहूराज तिकटे यांनी केली.