मुंबई : महान्यूज लाईव्ह
भारतीय हद्दीतून ९ मार्च रोजी पाकिस्तानच्या दिशेने एक मिसाईल गेल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र हे मिसाईल तांत्रिक चुकीने डागले गेल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे. ९ मार्च रोजी नेहमीच्या देखभालीच्या कामावेळी झालेल्या तांत्रिक चुकीमुळे ही मिसाईल डागली गेली. डागली गेलेली ही मिसाईल पाकिस्तानी हद्दीत जाऊन पडल्याची माहिती मिळाली आहे. या मिसाईलमुळे कोणत्याही प्रकारे जिवीतहानी झाली नसल्याचेही संरक्षण खात्याने म्हणले आहे.
या सगळ्या प्रकाराबाबत संरक्षण खात्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच असा प्रकार कसा घडला याची सखोल चौकशीदेखील करण्यात येत आहे.