पनवेल : महान्यूज लाईव्ह
छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यासाठी जिजाऊ असणे आवश्यक आहे. यासाठी जिजाऊच्या लेकीना वाचवणे गरजेचे आहे. आधुनिक जगात स्त्री व पुरुष समान असून स्त्रिया विविध क्षेत्रात कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे स्त्रीभूण हत्या रोखा असे आवाहन शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी केले.
तुळजाभवानी उत्सवानिमित्त न्हावे (ता. मुरबाड) येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज व तुळजाभवानी’ या विषयावरील व्याख्यानात देशमुख बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्यासह गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
प्रशांत देशमुख यांनी यावेळी सांगितले की, जिजाऊंनीच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापना करण्याची प्रेरणा दिली. विविध कठीण प्रसंगात त्या कणखरपणे उभ्या राहिल्या. तुळजाभवानी वरील श्रद्धेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान स्वराज्यावर चालून आला, तेव्हा मावळ्यांना लढण्यासाठी प्रेरित केले. त्यातूनच एक इतिहास घडला. त्या पराक्रमाचे गोडवे आपण आजही गात आहोत.
तुळजाभवानी हे भक्तीप्रमाणेच शक्तीचे हे प्रतिक आहेत. राजमाता जिजाऊ यांच्या प्रमाणेच महाराजांनी येसूबाई, ताराराणी या छत्रपतींच्या घरण्यातील स्त्रियांनाही मोठा पराक्रम केला. राजकीय कौशल्य दाखवत स्वराज्य अबाधित राखले. या स्त्रियांनी जो पराक्रम दाखवला त्याला तोड नाही. आज तर आधुनिक काळात स्त्रियांना प्रगतीचे अनेक क्षेत्रे खुली झाली आहेत. त्या क्षेत्रात महिला आपले कर्तृत्व गाजवत आहेत.
राजकारण, क्रीडा, प्रशिक्षण, लष्कर आदी सर्वच क्षेत्रात महिला पुढे आहेत हे सांगताना देशमुख यांनी इंदिरा गांधी, कल्पना चावला यांचे उदाहरणे दिली. तरी देखील वंशाचा दिवा या नावाखाली स्त्रीभूण हत्या केली जाते. जिजाऊ जन्माला येण्याआधीच तिला गर्भातच मारून टाकले जाते. तेव्हा पुन्हा घडायचा असेल, तर जिजाऊ असणे आवश्यक असल्याने स्त्रीभूण हत्या टाळा असे आवाहन त्यांनी केले.
या व्याख्यानास शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. देशमुख यांनी ओघवत्या शैलीत व्याख्यान देत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दरम्यान, तुळजाभवानी उत्सवानिमित्त समस्त हिंदुराव कुटुंबीयांतर्फे गावात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.