शिरूर : महान्युज लाइव्ह
जिद्द,चिकाटी अन् सातत्याच्या जोरावर लेकीने पोलिस दलात जायचे स्वप्न पूर्ण केले असून आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे.
मांडवगण फराटा ( ता. शिरूर ) येथील सीमा स्वरूप खोमणे यांची नुकतीच पिंपरी चिंचवड पोलिस दलात नियुक्ती झाली आहे.पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पोलिस दलात जायचे स्वप्न साकार केले आहे.
सीमा खोमणे यांची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. आई मंगलबाई,वडील स्वरूप यांनी अतिशय मेहनत करून मुलगा श्रीकांत व सीमा यांना चांगले शिक्षण दिले. सीमा हिने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथी पर्यंतचे शिक्षण घेतले.गावातील वाघेश्वर विद्यालयात बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बिकट असूनही शिक्षणाची ओढ असल्याने केडगाव येथील सुभाषअण्णा कुल महाविद्यालयातून मुक्तविद्यापिठातून बी. ए. पर्यंतचे उच्च शिक्षण घेतले. लहानपणापासून पोलिस दलात जायचेच हे स्वप्न असल्याने प्रचंड अभ्यास घेत बारामती येथे पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण घेतले. यानंतर नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये घवघवीत यश संपादन करत पोलिस दलात जायचे स्वप्न पूर्ण केले.
सीमा यांनी शिक्षणाबरोबरच रोज सकाळी पहाटे धावण्याचा सराव केला. घरी व्यायाम,सराव सुरु असतानाच विवाह झाला. विवाहानंतर पती व कुटुंबीयांनी स्वप्नाला आडकाठी न करता पूर्ण पाठबळ दिले. या सर्वांमुळे त्यांनी पोलीस भरतीत घवघवीत यश प्राप्त केले. सीमा यांची पिंपरी चिंचवड पोलीस दलात निवड झाली असून त्या मुंबई येथे प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या आहेत. दरम्यान सीमा यांचा मांडवगण फराटा ग्रामस्थांनी नुकताच यशाबद्दल सन्मान केला आहे.