शिरूर : महान्युज लाइव्ह
शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा या गावात जिल्हा परिषद शाळेत शिकून आयएएस, आयपीएस अधिकारी घडले असून या गावची तालुक्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत येथील अमित शहाजी धुमाळ यांनी घवघवीत यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदावर नाव कोरले आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा अगदी छोटंस गाव. या गावाने तालुक्यात नव्याने ओळख निर्माण केली असून अधिकाऱ्यांचे गाव म्हणून सर्वांना परिचित झाले आहे. या गावात आयएएस तसेच आयपीएस अधिकारी घडले आहेत, ते ही जिल्हा परिषद शाळेत.
नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात येथील अमित शहाजी धुमाळ यांनी घवघवीत यश संपादन केले.याबाबत संकेतस्थळ ” महान्युज लाइव्ह “(MahaNews Live.com) ने बातचीत केली असता यशाचा राजमार्ग त्यांनी उलगडला.
अमित धुमाळ यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी पर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. जीवन विकास विद्यालयात आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याकडे धाव घेतली.पुण्यातील वाडिया कॉलेज येथे मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एवढ्यावरच न थांबता जेएसपीएम कॉलेज येथे बी. ई. मेकॅनिकलचे शिक्षण घेतले. दरम्यान लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याने स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सुरू केली. सन २०१९ मध्ये परीक्षाही दिली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे या परीक्षेचा निकाल लागला नव्हता. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात अमित यांनी घवघवीत यश मिळवले. अखेर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदावर नाव कोरले.
या यशात गावातील आयआरएस अधिकारी श्रीधर धुमाळ, आयपीएस अधिकारी रमेश धुमाळ,सहायक पोलिस निरीक्षक सुप्रिया धुमाळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.
गावात या पूर्वी प्रतीक धुमाळ, डॉ.निधी शेळके यांनी आयएएस अधिकारी म्हणून नाव कोरले असून गावात जेवढे अधिकारी निर्माण झाले आहेत,तेवढ्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले आहे, हे इथले खास वैशिष्ठ आहे.
अमित यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.