दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : येथील त.ल.जोशी विद्यालयातील राज मांढरे या १० वीच्या विद्यार्थ्यांने ३ लहान मुले कालव्यात बुडत असताना प्रसंगावधान राखून त्यांचे प्राण वाचवले या मुलाचे सर्वत्र कौतुक होत असून वाई पोलिसांनी देखील त्याचे कौतुक केले आहे.
वाई पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांनी दिलेली माहिती अशी की, राज सुनील मांढरे (वय १६ राहणार गाडवेवाडी ता.वाई) हा वाई शहरातील तलजोशी विद्यालयात १० वीच्या वर्गात शिकतो. तो १० मार्च रोजी यशवंतनगर परिसरात राहणाऱ्या
मित्राकडे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जात होता.
त्या वेळी लगत असणाऱ्या धोम डाव्या कालव्यात मंगेश साळी (वय ८ वर्ष) सुभान साळी (वय ९ वर्ष) आणी यश पवार (वय १२ वर्षं, तिघेही राहणार यशवंत नगर ता.वाई) हे बुडत असताना कालव्यातून वाचवा वाचवा असा आवाज राज मांढरे याला आला. तो क्षणभर थांबला आणि कालव्याकडे पाहिले असता त्याला वरील तिघेजण कालव्यातून बुडत पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाताना दिसले.
त्या वेळी राज या विद्यार्थ्यांने क्षणाचाही विलंब न लावता अंगावरच्या कपड्यासह कालव्यात उडी टाकून
त्या बुडत असलेल्या तीनही लहानग्यांना बाहेर
काढुन त्यांचे प्राण वाचविले. त्याच्या या धाडसी कृत्याचे वाई पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे व सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी सत्कार करुन कौतुक केले. राज मांढरे याच्या प्रसंगावधानाचे व धाडसाचे वाई शहरासह तालुक्यातुन कौतुक केले जात आहे.