माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
हातवे खुर्द ( ता.भोर ) येथील सचिन शंकर खुटवड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या फौजदार पदाच्या परिक्षेत राज्यात पाचवा क्रमांक मिळवला असुन शारिरीक चाचणी परिक्षेत देखिल १०० पैकी १०० गुण मिळवत पोलिस सेवेतील फौजदार पदाला गवसणी घातली आहे.
सचिन खुटवडचे वडील शंकर गेणबा खुटवड गावी शेती व पुण्यात ड्रायव्हींगचा व्यवसाय करतात तर आई गृहीणी आहे सचिन ने प्रथम पासुनच शासकीय सेवेत जायचे स्वप्न बाळगुन विज्ञान शाखेतील पदवी नंतर सन २०१५ पासुन विविध स्पर्धा परिक्षा देण्यास सुरुवात केली होती सन २०१६ , २०१७ ,२०१८ व २०१९ या चारही वर्षी त्याने फौजदार परिक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला होता परंतु पायाला झालेल्या दुखापती मुळे सन २०१६ ,१७, व १८ यावर्षी तो शाररीक चाचणी मध्ये उत्तीर्ण होऊ शकला नाही, तरी देखील प्रयत्न न सोडता सन २०१९ मध्ये मुख्य परिक्षेत राज्यात पाचवा क्रमांक पटकावुन शाररीक चाचणी मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवुन दैदिप्यमान यश मिळवत पोलिस फौजदार होण्याचे स्वप्न साकार केले आहे.
सचिनच्या या यशाबद्दल त्याच्या मुळगावी हातवे खुर्द येथे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राष्ट्रवादीचे युवा नेते विक्रम खुटवड यांनी त्याचा सत्कार केला व शुभेच्छा देताना सचिनने स्वप्न उराशी बाळगुन त्याचा पाठलाग करत जे यश मिळवले आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे या यशामुळे गावासह परिसरातील युवकांना प्रेरणा मिळणार आहे, असे विचार व्यक्त केले.
सचिनने बोलताना माझ्या यशासाठी माझे आई वडील,भाऊ तसेच नातेवाईंक व मित्रांनी मोठे सहकार्य केले. पायाला दुखापत झाल्यावर शारिरीक चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यावर या सर्वांनी मला पुन्हा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. लवकरच प्रशिक्षण सुरु होईल. पोलिस दलात सेवा करताना प्रामाणिकपणे देशाची सेवा करत गावचे व तालुक्याचे नाव उज्वल करण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला आहे.