शिरूर : महान्युज लाइव्ह
शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील इनामगाव, बाभुळसर बुद्रूक,गणेगाव दुमाला, तांदळी या गावांसाठी ३८ कोटी ७६ लाख रुपये किमतीच्या पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार पवार यांनी सांगितले की,इनामगाव व पूर्व भागातील बाभुळसर बुद्रूक,गणेगाव दुमाला, तांदळी या तीन गावांचा नळ पाणीपुरवठा योजनेचा दरडोई खर्च हा विहित निकषाप्रमाणे सुमारे पाच कोटी पेक्षा जास्त येत असल्याने सदर नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य अभियंता यांनी प्रस्तावास तांत्रिक मान्यता दिली होती.तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्या छाननी उप समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे इनामगाव व बाभुळसर बुद्रूक,गणेगाव दुमाला, तांदळी या गावच्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेच्या ३८ कोटी ७६ लाख रुपये किमतीच्या योजनेस जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता मिळणे शासनाच्या विचाराधीन होती.त्यानुसार या पाणी योजनेच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या पाणी पुरवठा योजनेंतर्गत दहा टक्के रक्कम ही लोकवर्गणी स्वरूपात ग्रामपंचायतीकडे ठेवणे आवश्यक असून प्रत्येक घरात नळ जोडणी दिली जाणार आहे. ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.
याबाबत बोलताना बाभूळसर बुद्रूकच्या उपसरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांनी सांगितले की, या योजनेमुळे गावातील सर्व नागरिकांना घरोघरी नळ पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.त्यामुळे ही योजना लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा आहे.
तांदळीच्या सरपंच स्मिता गदादे यांनी सांगितले की, तांदळी या गावाला अनेकदा पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत होते.या परिसरातील अनेक ठिकाणी क्षारयुक्त पाणी असल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अनेकांना विविध आजारांना बळी पडावे लागते.मात्र या पाणी योजनेमुळे नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची प्रतिक्रिया स्मिता गदादे यांनी दिली.