पुणे : महान्यूज लाईव्ह
द्राक्ष हंगाम मध्यावर आला तरी चीनला अजून द्राक्ष निर्यात सुरु झालेली नाही. ही निर्यात सुरु न होण्याचे कारण चीनने द्राक्ष पाठविताना काय काळजी घ्यायची याचे निर्देश कळविले होते. परंतू अपेडा म्हणजेच शेतीमाल आणि प्रक्रियायुक्त पदार्थ निर्यात विकास एजन्सीने याबाबत वेळेत कार्यवाही न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने केला आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी सांगितले की, २०२० मध्येत चीनने द्राक्ष निर्यातीबाबत सविस्तर दिशानिर्देश दिले होते. या निर्देशाप्रमाणे केलेल्या उपाययोजनांचे चित्रीकरण करून ते चीनच्या संबंधित यंत्रणेला पाठवायचे होते. परंतू अपेडाने याबाबत माहिती द्राक्ष बागायतदार संघ आणि निर्यातदारांना दिलीच नाही. मागील करोना काळात निर्यातीला अडचणी आल्या होता. तरीही काही कंटेनर चीनला गेले होते. पण तपासणी केल्याशिवाय आयात न करण्याची भूमिका चीनने घेतली होती. त्यामुळे अद्यापपर्यंत चीनला होणारी निर्यात सुरूच झालेली नाही.
याबाबत अपेडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आम्हाला चीनकडून जानेवारी २०२२ मध्ये दिशानिर्देश मिळाले होते. त्यानूसार सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे. आमच्याकडून कोणताही उशीर झालेला नाही, असे सांगितले आहे. यानूसार ऑनलाईन पद्धतीने बागा, शीतगृह आणि निर्यातसुविधांची तपासणी सुरू होणार आहे. त्यानंतर चीनला निर्यात सुरु होईल, असेही अपेडाचे म्हणणे आहे.
चीनला हिरव्या रंगाच्या लांब मण्यांची आणि काळी द्राक्षे निर्यात होतात. ही द्राक्षे युरोपला जात नाहीत. काही प्रमाणात या द्राक्षांची निर्यात रशियाला होते. परंतू रशियात सुरु असलेल्या युद्धामुळे ती निर्यातही बंद पडली आहे. चीनला होत असलेल्या निर्यातीमुळे देशांतर्गत बाजारपेठेतही या द्राक्षांना चांगला बाजारभाव मिळत होता. परंतू निर्यातबंदीमुळे देशातही भाव पडले आहेत.
आता मार्च महिनाच्या पहिले दहा दिवस तर निघून गेले. आता जरी निर्यात सुरु झाली तरी त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होईल असे वाटत नाही.