रस्त्याच्या भूमिपूजनालाच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना झालं निकृष्ट दर्जाच्या कामाचे दर्शन..! कामाच्या दर्जावर तीव्र नाराजी व्यक्त करत भरणेंनी ठेकेदाराला भरला दम.. इंदापूर तालुक्यातील शहा पाटी येथील प्रकार..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील शहा पाटी ते शहा गावच्या मंजूर असलेल्या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी लावण्यात आलेली कोनशिला सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निखळलेली पाहताच भरणे हे कमालीचे नाराज झाल्याचे दिसून आले..
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह युट्यूबवर पाहू शकता
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रस्त्याची भूमीपूजनाची कोनशिला निखळलेली पाहताच या कामाचा ठेकेदार कोण आहे हे विचारले. या कामाचा ठेकेदार तिथेच उपस्थित होता. असे निकृष्ट दर्जाचे काम करणे योग्य नसून यापुढे तुला काम आणि सदर कामाचे बिल काढू देणार नाही असा दम राज्यमंत्री भरणे यांनी त्या ठेकेदाराला भरला.
या ठेकेदाराने इतर ठिकाणीही अशीच कामे केल्याचे चर्चा तिथे ऐकायला मिळाली. राज्यमंत्री भरणे हे इंदापूर तालुक्यातील रस्ते हे दर्जेदार व्हावेत यासाठी भरघोस निधीची तरतूद करत आहेत. कोट्यवधी रुपयांची रस्त्यांची कामे चालू असतानाच अनेक ठिकाणी ठेकेदार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताला धरून निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे समजते.
इंदापूर तालुक्यातील शहा भागात मोठा गाजावाजा करत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला. मात्र ठेकेदार हे शासकीय पैशावर डल्ला मारत असल्याची शंका सामान्य माणसाच्या निर्माण होत असतानाच खुद्द सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या नावाने लावण्यात आलेली कोनशिला निखळली होती. आता काम कसलं झालं असेल याचा विचार करून ठेकेदारावर व त्याच्या चालू असलेल्या कामावर उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.