मुंबई : महान्यूज लाईव्ह
काल विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ आणि ऑडिओ क्लीपच्या १२५ तासाच्या रेकॉर्डींगसह केलेल्या आरोपांवर आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या आरोपांबाबत महाराष्ट्र सरकारने जरुर चौकशी करावी असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
आपले नाव प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे यात घेतले असले तरी यात आपला काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारचे विशेष सरकारी वकील, काही पोलीस अधिकारी काही मंत्र्यांच्या साह्याने विरोधी पक्षातील नेत्यांना संपविण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांना राजकीयदृष्ट्या संपविण्याचे शरद पवार यांनी ठरविले आहे, या आरोपाबाबत विचारता शरद पवार हसून म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपमध्ये यापेक्षा अधिक मनोरंजक माहिती असली पाहिजे. कुणालाही असे संपवता येत नाही, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊन यांनी केलेल्या तक्रारींचीही चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
सहा महिने किंवा वर्षापूर्वी भाजपा नेत्याच्या एका सहकाऱ्याबाबत काही गंभीर तक्रारी मी देवेंद्र फडणवीसांच्या कानावर घातल्या होत्या, असेही पवार यांनी सांगितले.
सार्वजनिक आयुष्यात वावरणाऱ्या व्यक्तीबाबत काही तक्रारी असतील तर त्याबद्दल सार्वजनिकरित्या वाच्यता करणे योग्य नाही. त्यामुळे मी फडणवीसांना याबाबत चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर हा विषय माझ्यासाठी संपला, असेही त्यांनी सांगितले.