बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील तब्बल १६ विद्यार्थ्यांनी पोलिस उपनिरीक्षक या पदाला गवसणी घातली व राज्य सेवा परीक्षेत विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ही नेत्रदीपक कामगिरी करून एक वेगळा ठसा उमटवला.
सौ. सुनेत्रावहिनी पवार यांच्या सूचनेवरून ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पोलिस अधिकारी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातून प्राजक्ता घुले, कल्याणी जावळे, प्रतीक्षा वनवे, अश्विनी कदम, दिपाली धालपे, संजय कोकरे, दत्तात्रेय बाराते, शैलेश मोरे, अशोक नरोटे, निलेश ओमासे, पृथ्वी बाराते, मनोज कदम, मनोज आळंद, शंकर पाटील, शुभम शिंदे, दीपक लोणकर असे तब्बल १६ विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक पदी एकाच वेळी भरती झाले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी दिली. या विद्यार्थ्यानी कोरोनाच्या काळात कठोर परिश्रम घेतले त्यामुळेच त्यांना हे अशक्यप्राय आवाहन पेलता आले.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. सुनिल ओगले यांनी टाळेबंदी असतानाही त्यांची संपूर्ण तयारी करून घेतली, विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यामुळेच हे उत्तुंग यश संपादन करता आले. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष धन्यवाद देऊन डॉ. ओगले यांनी यासाठी महामारीच्या काळात ग्रंथालयातील वाचनकक्ष, संस्थेचे भव्य असे क्रिडांगण उपलब्ध करून दिले. तसेच त्यांना वर्षंभर योग्य मार्गदर्शन केले, तज्ञ व्यक्ती कडून आभासी मुलाखतीही घेतल्या. मंगळवेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मा. बापूसाहेब पिंगळे, प्रा. डॉ. विलास बुवा, प्रा. डॉ. संजय खिलारे, प्रा. डॉ. सुनिल ओगले व स्वतः डॉ भरत शिंदे यांनी सुद्धा अशा मुलाखतीसाठी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना बोलते केले व त्यांचा आत्मविश्वास वाढविला.
या सोळा विद्यार्थ्यांमध्ये ५ मुली आहेत. जागतिक महिला दिनादिवशी त्यांची निवड झाली त्यामुळे महाविद्यालयात ख-या अर्थाने महिला दिन साजरा झाला असे उदगार संस्थेच्या सचिव अँड नीलिमाताई गुजर यांनी काढले
आपल्या सर्व सहकार्यांना अभिमान वाटावा अशी कामगिरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. सुनिल ओगले व समिती सदस्यांनी केली.
त्यामुळे आजचे हे जे बंपर यश मिळाले आहे आणि त्यासाठी टाळेबंदी असूनही ग्रामीण भागातील गरीब घरातील विद्यार्थ्यांनी घेतलेली कठोर मेहनत आणि या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शिक्षकांनी केलेले योग्य मार्गदर्शन हेच या यशाचे गमक आहे असे प्रतिपादन सौ सुनेत्रा पवार यांनी केले.
प्राचार्य डॉ. भरत शिंदे, डॉ. सुनील ओगले,
उपप्राचार्य अंकुश खोत, डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. शामराव घाडगे, प्रा. निलिमा पेंढारकर, व इतर प्राध्यापकांनी तसेच संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, डॉ. राजीव शहा, श्री. किरण गुजर, श्री. मंदार सिकची, व रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.