बारामती : महान्यूज लाईव्ह
काल दिवसभर ईडी आणि आयटी विभागाने टाकलेल्या धाडींची चर्चा सुरु होती. या धाडींमध्ये बहुतेक सगळी नावे राजकारण्यांशी संबंधित असली तरी एका वादग्रस्त प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे नावही या धाडीच्या निमित्ताने पुढे आले होते. या अधिकाऱ्याच्या बारामतीतील प्रॉपर्टीसंदर्भात नवी माहिती पुढे येत आहे.
बजरंग खरमाटे हे दोन वेळा निलंबित झालेले प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत. पुर्वी परिवहन खात्याच्या मंत्र्यांच्या ते जवळचे मानले जायचे. या खरमाटे यांनी अनेक ठिकाणी बेकायदा प्रॉपर्टी जमा केलेली आहे. याच खरमाडेंच्या प्रॉपर्टीची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या बारामतीत आले होते. त्यावेळी त्यांनी बारामती शहरातील जळोची येथील ४००० चौ.मी जागेतील बांधकामाची पाहणी केली होती. ही जागा खरमाटे यांचा मुलगा प्रथमेश याच्या नावावर आहे.
परंतू याखेरीजही खरमाटे यांच्या मालमत्ता बारामतीत आहेत, म्हणजे होत्या. या मालमत्तांची माहिती कदाचित किरीट सोमय्या यांनाही नसावी असे दिसते आहे. काल खरमाटे यांच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर धाडी पडत असताना अगदी काही दिवसांपूर्वी खरमाटेंशी संबंधित बारामतीतील मालमत्तेची घाईघाईने विक्री झाल्याची माहिती उघड होत आहे.
बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीत खरमाटे यांच्या भावाच्या म्हणजे साहेबराव काका खरमाटे या नावावर गट नं. ११४ /१ / १ /२ पैकी बिनशेती प्लॉट नं ८ क्षेत्र अशी १.७४.२४ आर. चौ. मी. मधील क्षेत्र काही दिवसांपूर्वीच विक्री केलेले दिसून आले आहे.
३ आणी ४ मार्च रोजी हे व्यवहार झाले आहेत. यातील आणखी विशेष गोष्ट म्हणजे या जमिनीचे एकाच दिवशी ३१ खरेदीदस्त झाले आहेत. बहुतेक खरमाटे यांना ईडीच्या किंवा आयकर विभागाच्या धाडीची अगोदरच कल्पना आली होती की काय याची शंका येते आहे.
आता हे झालेले व्यवहारही केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर येणार का ? आणि जर असे झाले तर ज्यांनी या जागा विकत घेतल्या त्यांच्यापुढील अडचणी वाढणार का ? याची सध्या बारामतीत चर्चा सुरु आहे.